राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By Admin | Published: October 26, 2014 11:36 PM2014-10-26T23:36:00+5:302014-10-26T23:39:55+5:30

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे.

National Highway again known for encroachment | राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

googlenewsNext


सोमनाथ खताळ , बीड
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. महिनाभरापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते, मात्र पालिकेने केलेल्या हा कारवाईचा बार फुसकाच ठरल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांनी नगर पालिका, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून शहरात अतिक्रमणे केले आहेत. यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत आहे.
बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथून दररोज हजारो वाहनांची वाहतूक असते. यामध्ये अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. शहराला बायपास नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही शहराच्या मध्यातूनच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेलेले आहेत. एवढे प्रकार घडूनही अद्याप ही अतिक्रमणे हटलेले नाहीत. त्यामुळे यानंतरही ही अपघाताची मालिका चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
पोलीस घेतात बघ्याची भूमिका
शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या पोलिसांसमोरच अतिक्रमणे केलेली असतात. हिच अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असतानाही ते हटविण्यास कोणीही पुढे येत नाहीत. या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमणे पाहता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे पोलिसांनीही यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कडक कारवाईची आवश्यकता
राष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर ठिकाणी जी अतिक्रमणे थाटली आहेत, अशा अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या अतिक्रमणधारकांना अनेकवेळा संबंधित विभागाकडून केवळ नोटिसा पाठविल्या जातात, मात्र कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य आणखीनच वाढत जाते. या अतिक्रमणांवर कायमचा हातोडा फिरवून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणीही वाहनधारकांमधून केली जात आहे.
साठे चौकात होतो अधिक त्रास
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून सुभाष रोडची ओळख आहे. या मार्केटमध्ये जाण्यासाठी साठे चौकातून जावे लागते. मात्र याठिकाणी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठी अडचण होते. अनेकांचे या ठिकाणी अवजड वाहनाखाली चिरडून बळीही गेलेले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
अवैध वाहतूक करणारे वाहनेही करतात अडचण
शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड, सरकारी दवाखाना परिसर, नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, नगर नाका या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून अवैध प्रवाशी वाहतूक करतात. ही वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहेत. यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: National Highway again known for encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.