औरंगाबाद खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:20 AM2017-12-10T00:20:26+5:302017-12-10T00:20:31+5:30
सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या प्रभावी वापराने लाखो लोकांना वेळेत न्याय मिळाला, हजारो कोटी रुपयांचे दावे निकाली निघाले, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे ताहीलरमानी यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (दि.९ डिसेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती ताहीलरमानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले.
यावेळी मंचावर औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती न्या. आर. एम. बोर्डे तसेच खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. आर. एम. बोर्डे यांच्या आदेशावरून या लोकन्यायालयाने आयोजन करण्यात आले होते. न्या. ताहीलरमानी यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करताना, सामंजस्याने, परस्पर संमतीने आणि तडजोडीने निकाली निघणाºया, लोकन्यायालयात प्रकरणांमुळे सर्वच पक्षांना खरा न्याय मिळाल्याचे समाधान मिळते, असे सांगितले.
या प्रसंगी न्या. आर. एम. बोर्डे यांनी लोकन्यायालय आयोजन आणि त्याला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. आजपर्यंत आयोजित चार लोकन्यायालयांत एकंदर २५६३ प्रकरणे दाखल होऊन एक हजार २५६ प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील आयोजनाने राष्ट्रीय पातळीवर उच्चांक केल्याचेही त्यांनी सांगितले. आज झालेल्या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे तसेच भूसंपादन केल्यापोटी व शेतकºयांना मोबदला मिळण्यासाठी दाखल प्रकरणावर सुनावणी झाली. कार्यक्रमाला खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, लोकन्यायालयात आज सहभागी झालेले निवृत्त न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.