राष्ट्रीय पक्षांकडून ‘शेकाप’चे ‘हायजॅक’
By Admin | Published: September 30, 2014 01:12 AM2014-09-30T01:12:37+5:302014-09-30T01:30:45+5:30
औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे,
औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे, अशी भूमिका उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे (वाशी) प्रा. अभिमान माने यांनी मांडली.
प्रा. अभिमान माने यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका’ या विषयावर शोधप्रबंध पूर्ण केला. आज सोमवारी शोधप्रबंधावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात त्यांची खुली मुलाखत (ओपन व्हायवा) झाली.
यावेळी प्रा. माने यांचे मार्गदर्शक म्हणून डॉ. विठ्ठल मोरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे, बाह्य परीक्षक म्हणून डॉ. व्ही. एल. एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिल्यानंतर विद्यापीठाने त्यांचा शोधप्रबंध स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाने प्रा. अभिमान माने यांना पीएच.डी. प्रदान केली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रा. माने यांना थेट प्रश्न केला की, महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी कामगार पक्ष हा निष्प्रभ झाला आहे. त्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती? त्यावर ते म्हणाले, प्रामुख्याने १९९० नंतरपासून शेकाप हा महाराष्ट्राच्या राजकारणातून नामशेष होत गेला. १९९० मध्ये देशाने मंडल आयोग स्वीकारला. त्यानंतर देशभरात जातीय दंगलीचे लोण उसळले. तेव्हापासूनच राजकारणामध्ये हिंदुत्वावादी पक्षांचा शिरकाव झाला.
तत्पूर्वी, फुले, शाहू, आंबेडकरी विचार घेऊन शेकापने लोकांच्या प्रश्नांवर चळवळ उभारली. अनेकदा संघर्ष केला. त्यातून सरकारला अनेक योजना स्वीकारणे भाग पडले. अलीकडे प्रस्थापित भाजपा, काँग्रेस व तत्सम राष्ट्रीय पक्षांनी उदारीकरण, मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. प्रतिगामी विचाराचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. या पक्षाने भांडवलदाराची भूमिका घेतली आहे.
असे असले तरी या पक्षाने पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरूण सत्तेचे समीकरणे जुळवली आहेत. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाने शेकापचे सारेच कार्यक्रम ‘हायजॅक’ केले. शिवाय, शेकापचे पक्षांतर्गत वैचारिक मतभेद, या बाबीमुळे शेकाप हा राजकारणातून नामशेष होत गेला.
शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकऱ्यांना मुक्त आर्थिक धोरण मारक आहे. शेकापने या धोरणाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या धोरणाच्या विरोधात व लोकप्रश्नांवर राज्यातील समविचारी डाव्या पक्षांना बरोबर घेऊन शेकापला महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करण्याची संधी आहे, असा निष्कर्ष पीएच.डी. प्राप्त प्रा. अभिमान माने यांनी मांडला.