‘सीएए’च्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचची मोठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:18 PM2019-12-26T12:18:56+5:302019-12-26T12:20:43+5:30
कायद्याला विरोध करणारे संघ परिवाराच्या विरोधात षड्यंत्र रचत असल्याचा रॅलीनंतरच्या सभेत आरोप
औरंगाबाद : राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने आज सकाळी हातात तिरंगा ध्वज व घोषवाक्यांचे फलक घेऊन रॅली काढण्यात आली. क्रांतीचौकातून या रॅलीस प्रारंभ झाला. तेथून ही रॅली सतीश मोटार, सावरकर चौक, निराला बाजारमार्गे औरंगपुरा येथील फुले दाम्पत्याच्या पुतळ्यावजळ आली. सभेत रूपांतरित होऊन ही रॅली विसर्जित झाली. यावेळी मोदी-मोदी, असे नारे लावण्यात आले व ‘जब तक सूरज-चांद रहेगा, मोदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या प्रमाणावर महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला. ‘एक भारतीय म्हणून माझा सीएएला पाठिंबा आहे. सीएए के सम्मान में, हम मैदान में, तिरंगे के सम्मान में, राष्ट्रभक्त मैदान में,’ अशा वाक्यांचे फलक प्रत्येकाच्याच हातात होते. रॅली औरंगपुऱ्यात आल्यानंतर फुले दाम्पत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तेथेच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे भाषण झाले.या कायद्याला विरोध करणारे संघ परिवाराविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. ३० खासदारांच्या समितीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व शिवसेनेचेही खासदार होते. अडीच वर्षांपर्यंत यावर मंथन चालू होते. मग त्यावेळी या खासदारांनी का विरोध केला नाही? असा सवाल बागडे यांनी केला. निर्वासित भारतात का आले? पाकिस्तानातले २३ टक्के हिंदू कुठे गेले? काश्मीर खोऱ्यात दहा टक्केहिंदू होते. आता दुर्बीण लावून पाहिले तरी ते दिसत नाहीत. भारत हा काही धर्मशाळा आहे का? असे अनेक सवाल उपस्थित करीत बागडे यांनी सीएएचे जोरदार समर्थन केले.
आमदार अतुल सावे, शहर भाजपचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी, मधुकर जाधव, पुरुषोत्तम हेडा, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, डॉ. दिवाकर कुलकर्णी, माजी उपमहापौर विजय औताडे, प्रमोद राठोड, अप्पा बारगजे, प्रवीण घुगे, लता दलाल, जयश्री कुलकर्णी, राजेश मेहता, दयाराम बसैये बंधू, रेखा जैस्वाल, अॅड. माधुरी अदवंत, डॉ. भागवत कराड, सुवर्णा धानोरकर, अनिल मकरिये, भाऊसाहेब ताठे, सागर नीळकंठ, अजय तलरेजा, दयाल तलरेजा, श्रीचंद तलरेजा, अमृतलाल नाथानी, नानक कटारिया, प्रा. गजानन सानप, गौराबाई जाटवे, सी.एस. सोनी, सतीश लड्डा, किशोर शेलार, भारती बागरेचा, कविता अजमेरा, पल्लवी शहा, मंगला पारख, मेघा सुगंधी, कमलबाई ओस्तवाल, चंचल चोपडा, रविना सुगंधी आदींनी या रॅलीत सहभाग घेतला. राष्ट्रगीतानंतर सभा संपली.
अब हम खुश है...
पाकिस्तानातून औरंगाबादेत येऊन अनेक वर्षे राहत असलेल्या काही बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आशिष नावंदर यांनी सीएए कायद्याची माहिती दिली, तसेच रॅलीभर या कायद्याविषयी संक्षिप्त माहिती देणारी पत्रके वाटण्यात येत होती. ‘आमचा पाकिस्तानात खूप छळ झाला. मंदिर, दुकाने जाळून टाकण्यात आली. धर्मपरिवर्तन करा नाही तर भारतात जा, असे सांगण्यात येत होते. मागील वीस वर्षांपासून आम्ही औरंगाबादेत राहत आहोत. सीएए कायदा केल्याने आम्ही फार खुश आहोत. आता आम्ही भारताचे नागरिक होणार! (टाळ्या आणि मोदी-मोदीच्या घोषणा)