आजपासून रंगणार राष्ट्रीय योगा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:03 AM2019-01-29T00:03:43+5:302019-01-29T00:03:55+5:30
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा एकूण एक हजार जणांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपर्यंत रंगणारी ही स्पर्धा क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये विद्युत प्रकाशझोतात होणार आहे. १४ व १७ वर्षांखालील मुले, मुलींची ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेत अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू आपला कसब पणाला लावणार आहेत. या स्पर्धेमुळे योगा खेळाचे चांगले वातावरण निर्माण होणार असून, त्याचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होईल. जनतेने या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे सांगतानाच भविष्यात औरंगाबादेत फेडरेशनची राष्ट्रीय योगा स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून आलेल्या राम अवतार यांनीही ही स्पर्धा अत्युच्च दर्जाची होईल, असा विश्वास व्यक्त केला, तसेच ही स्पर्धा इतरांसाठी एक आदर्श व अद्भूत ठरेल, असेही त्यांनी सांगितले. स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे २९ जानेवारी रोजी सकाळी १0.३0 वाजता राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, जिल्हा योगा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा योगा संघटनेचे सुरेश मिरकर आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राजाराम दिंडे, गोकुळ तांदळे, गणेश बेटुदे, जिल्हा संघटनेचे सचिव सुरेश मिरकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचा संघ
१४ वर्षांखालील मुले : ओम राजभार, ओम कोल्हे, रूपेश संघे, यश पानीभाटे, प्रणय कांगले, कौशिक चाकोटे, ओमकार साकत. क्रीडा मार्गदर्शक : जतीन सोळंकी.
१४ वर्षांखालील मुलींचा संघ : रिद्धी बाचीम, आर्या तांबे, सुहानी गिरीपुंजे, मृणाल खोत, मृणाली बनैत, स्वानंदी वालझडे, क्रीडा मार्गदर्शक : श्वेता पेडणेकर.
१७ वर्षांखालील संघ (मुले) : आयुष गोरे, मानन कासलीवाल, सुमित पोटे, केदार दिवटे, अभिजित सावंत, दूर्वांकुर चाळके, सुमित पोटे. क्रीडा मार्गदर्शक : रविभूषण कुमठेकर.
१७ वर्षांखालील मुलींचा संघ : प्राप्ती किनारे, तनुश्री पालांदूरकर, साक्षी काटे, गौरी दाकवे, तन्वी कुंभार, सानिका जाधव. क्रीडा मार्गदर्शक : अनिता पाटील. संघ व्यवस्थापक : गोकुळ तांदळे, लता लोंढे.