मराठी तरुणाईचा स्वभावच यशात अडथळा निर्माण करतो; यूपीएससी यशस्विता घुगे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 08:00 PM2018-04-30T20:00:26+5:302018-04-30T20:03:13+5:30
रे कुठे यूपीएससीसारख्या अवघड परीक्षांच्या वाट्याला जातो. त्यापेक्षा एमपीएससी आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूया, हा सर्वसाधारण मराठी तरुणाचा स्वभावच त्याच्या यशात अडथळा आणतो.
औरंगाबाद : अरे कुठे यूपीएससीसारख्या अवघड परीक्षांच्या वाट्याला जातो. त्यापेक्षा एमपीएससी आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करूया, हा सर्वसाधारण मराठी तरुणाचा स्वभावच त्याच्या यशात अडथळा आणतो. आपण स्वप्नच बघत नाही म्हणून मागे राहतो. त्यामुळे स्वप्न बघा, यूपीएससी परीक्षांचाही विचार करा, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेमध्ये ७६५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या डॉ. मोनिका घुगे यांनी केले.
मूळच्या अंबड तालुक्यातल्या असणाऱ्या डॉ. मोनिका यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथेच झाले. शारदा मंदिर शाळेत शिकत असताना तेथील शिक्षिकांनीच मला प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करण्याचा मार्ग सुचविला, असे त्यांनी नमूद केले. या परीक्षांची तयारी करायची म्हणजे केवळ अभ्यास एके अभ्यास असे सूत्र अनेकांच्या मनात असते; पण या क्षेत्रात येण्यासाठी अभ्यासासोबतच तुमचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याची गरज असते. यासाठी पालकांनीही मुलांच्या वेगवेगळ्या आवडी-निवडी ओळखून त्यांना छंदवर्गाला घालावे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे चतुरस्त्र बनेल, यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षेची तयारी कशी केली, हे सांगताना डॉ. मोनिका म्हणाल्या की, आपण अभ्यासाच्या तासांचे नव्हे तर अभ्यासाचे नियोजन केले. प्रत्येक दिवशी किती अभ्यास करायचा, हे ठरलेले असायचे. मग त्यासाठी किती तास लागतात, हे कधी पाहिले नाही. वाचन, मेडिटेशन, लिखाण यासारख्या छंदातून आपण अभ्यासाचा ताण घालवायचो, असेही त्यांनी सांगितले. पंख्याखाली बसून जास्तीत जास्त वाचन करणे, म्हणजे अभ्यास. त्यामुळे अभ्यासाइतकी सोपी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. ‘झिंगणे’ या मराठवाडी गुणाचा वापर अभ्यासात ‘झिंगून’ जाण्यासाठी करा. मागे ओढणारे अनेक असतात, अशा लोकांपासून दूर राहा. कधीही कोणत्याही अपयशासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बुद्धिमत्तेच्या जोरावर करू शकतो मात
मराठी माध्यमातली मुले कमी पडत नाहीत; पण लोकसेवा आयोगासाठी प्रमाण मानली जाणारी अनेक पुस्तके केवळ इंग्रजी भाषेतच असल्यामुळे निश्चितच इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा त्यांना अधिक संघर्ष करावा लागतो, असे डॉ. मोनिका यांनी सांगितले.मुलाखतीच्या वेळी इंग्रजीमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास इंग्रजी माध्यमातल्या मुलांमध्ये अधिक असतो; पण तरीही बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण या सगळ्या गोष्टीवर मात करूच शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.