माजलगावातील मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप

By Admin | Published: June 11, 2014 12:20 AM2014-06-11T00:20:14+5:302014-06-11T00:25:59+5:30

माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यांची साफसफाई कोणी करावी? याबद्दल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद चालू आहे.

The nature of a pond in main streets of Majalgaon | माजलगावातील मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप

माजलगावातील मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप

googlenewsNext

माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यांची साफसफाई कोणी करावी? याबद्दल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद चालू आहे. या दोघांच्या वादात नालेसफाईचे काम रखडले असून, याचा त्रास वाहनधारकांसह पादचारी व परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
माजलगाव शहराचा मुख्य रस्ता हा संभाजी चौक ते सिंदफणा नदीपात्रापर्यंतचा आहे. या मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करतो. यावर रस्त्याचे काम असो वा नाली बांधकाम, हे आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून केलेले आहे. यापूर्वी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या नाल्या साफ करण्याचे काम केले जात असे; परंतु मागील दोन वर्षांपासून या शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्यांची साफसफाई या विभागाकडून करण्यात आली नसल्याने या भागातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. नाल्यात येणारे घाण पाणी कचऱ्याला आडून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने दोन महिन्यापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काम करण्यात आले होते.
या रस्त्यावर पाणी येत असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांसह नाल्यातून रस्त्यावर आलेल्या घाण पाण्याचा त्रास वाहनधारकांसह पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. साफसफाई करण्याची मागणी सर्वसामान्यांतून केली जात आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील नालीचे घाण पाणी अंगावर उडून येत आहे. सार्वजनिक विभाग व नगरपालिकेच्या वादात पावसाळा आला असतानाही नाल्या साफ करण्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. याचा त्रास रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांसह परिसरातील व्यापाऱ्यांना होत आहे.
काय म्हणाले अधिकारी...
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम.बी. शिंदे म्हणाले, मुख्य रस्त्यावरील नाल्या साफसफाईचे काम आमच्या विभागाचे नसून, ते नगरपालिकेचे आहे. तर न.प.चे नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके म्हणाले, सा.बां. विभागांतर्गत हा मुख्य रस्ता येत असल्याने या रस्त्याजवळील नाल्या सफाईचे काम याच विभागाचे आहे. मागील वर्षीही त्यांनी नाले सफाई न केल्याने हे काम नगरपालिकेनेच केले होते. आमची आर्थिक परिस्थिती क्लिष्ट असल्याने आम्हाला हा खर्च परवडत नाही, असे सांगून सा.बां व न.प.ने आपल्या जबाबदाऱ्या झटकून दिल्या. (वार्ताहर)

Web Title: The nature of a pond in main streets of Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.