निसर्गाचा खेळ! ऑगस्ट महिना लागला, मराठवाड्यात पाऊस ४९ टक्क्यांवर थांबला
By विकास राऊत | Published: August 2, 2023 01:42 PM2023-08-02T13:42:49+5:302023-08-02T13:43:20+5:30
जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस आजवर बरसला असून, मराठवाड्यात ४९ टक्क्यांवर पाऊस थांबला आहेे. ६१ दिवसांत फक्त ४९ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला असला तरी नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात पावसाने दडी मारली आहे.
जून व जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा संपुष्टात आला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील ६१ दिवसांमध्ये ३३२.९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी ४९० मि.मी. पाऊस झाला होता. ३४० मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत अपेक्षित होता. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर व मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांतील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांसह मध्यम १०७ व लघू ७४९ प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. दरम्यान, अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जायकवाडीत ३२ टक्के पाणी
मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ३२ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पात सध्या ४ हजार २५६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. १ जूनपासून १७६ दलघमी पाणी प्रकल्पात आले आहे. १.०४१ दलघमी पाण्याचा विसर्ग काळात झाला आहे.
जिल्हा.......झालेला पाऊस
छत्रपती संभाजीनगर....२४१ मि.मी.
जालना....२५१ मि.मी.
बीड.......२४० मि.मी.
लातूर ....३१३ मि.मी.
धाराशिव....२६५ मि.मी.
नांदेड.....५७६ मि.मी.
परभणी...२७३मि.मी.
हिंगोली...४२९ मि.मी.
एकूण....३३२ मि.मी.