५० कोटींची फसवणूक करणाऱ्या नौहिरा शेखला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:49 PM2018-12-15T22:49:18+5:302018-12-15T22:49:46+5:30
गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन शहरातील जवळपास २४०० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाºया हिरा ग्रुपच्या व्यवस्थापक नौहिरा शेख यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कोटार्तून वॉरंट मिळवून मुंबईच्या कारागृहातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
औरंगाबाद : गुंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचे आमिष देऊन शहरातील जवळपास २४०० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाºया हिरा ग्रुपच्या व्यवस्थापक नौहिरा शेख यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने कोटार्तून वॉरंट मिळवून मुंबईच्या कारागृहातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कोर्टातून अटक वॉरंट मिळवून आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता नौहिरा शेख यांना ताब्यात घेतले. त्यांना घेऊन आर्थिक गुन्हे शाखेची टीम पहाटे औरंगाबादेत दाखल झाली. त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुंतवणुकीची होणार चौकशी
हिरा ग्रुपने औरंगाबादेतून तब्बल ५० कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. ही रक्कम हिरा गोल्डच्या बँक खात्यात जमा केली होती. ही रक्कम कोठे गुंतविली, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलीस कोठडीदरम्यान करणार आहे. या रकमेतून औरंगाबादेत कोणती संपत्ती विकत घेतली का, याचीही चौकशी होणार आहे.
हैदराबादच्या हिरा ग्रुप आॅफ कंपनीने गुंतवणूकदारांना आमिषाने पॉलसी विकल्या. २०१३ ते २०१७ पर्यंत या कंपनीत गुंतवणूक करणाºया नागरिकांच्या खात्यावर पैसाही जमा झाला. त्यामुळे औरंगाबाद शहरात गुंतवणूक करणारांची संख्या जवळपास २४०० वर पोहोचली; परंतु मे २०१८ नंतर कंपनीने खात्यावर व्याज जमा करण्याचे बंद केले. गुंतवलेली मुद्दलही देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे शहागंज भागातील दुर्रेशहवार बेगम मुबशीर हुसेन यांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक नौहिरा नन्नसाहेब शेख (४४, रा. तव्वाली चौक, वालीस कॉलनी, हैदराबाद) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुन्हा चार जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलिसांनी सिटीचौक भागातील हिरा ग्रुपच्या कार्यालयाची झडती घेऊन कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांवरून औरंगाबाद शहरात तब्बल २४०० नागरिकांनी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले. हिरा ग्रुपने मुंबईत ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. मुंबई पोलिसांनी ग्रुपच्या प्रमुख नौहिरा शेख यांना हैदराबादेतून अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनीही चौकशीसाठी नौहिरा यांना ताब्यात घेतले होते. औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नौहिरा शेख यांना ताब्यात घेण्याचा अर्ज मुंबई न्यायालयात दाखल केला.