छत्रपती संभाजीनगरच्या नवल टाटा स्टेडियमची उभारणी अन् लोकार्पण झाले रतन टाटांच्या हस्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:44 PM2024-10-10T13:44:43+5:302024-10-10T13:46:37+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी दर्जेदार स्टेडियम मिळावे म्हणून टाटा यांनी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात नवल टाटा स्टेडियमची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आणि मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक डॉ. रफीक झकेरिया यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी दर्जेदार स्टेडियम मिळावे म्हणून टाटा यांनी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात नवल टाटा स्टेडियमची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी भरघोस निधीही दिला. या स्टेडियमचे लोकार्पण स्वत: रतन टाटा यांच्या हस्ते झाले. स्टेडियमवरील विद्यार्थ्यांकडून मिळालेला सन्मान पाहून ते भारावून गेले होते, अशा आठवणी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक झकियोद्दीन सिद्दीकी ऊर्फ मश्शू सर यांनी सांगितल्या.
ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरावर रतन टाटा यांचे विशेष प्रेम होते. विविध समारंभ, लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते शहरात आले. डॉ. रफीक झकेरिया आणि पद्मश्री फातमा झकेरिया यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक नाते होते. आपले वडील नवल टाटा यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम उभारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. झकेरिया दाम्पत्याने ती मान्य केली. मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील ग्राउंडवर स्टेडियम उभारणीस मुभा दिली. वास्तुविशारद कुलकर्णी आणि आय. क्यु. कादरी यांनी सुंदर संकल्पना तयार केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत सुंदर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. २००१ मध्ये स्टेडियमचे लोकार्पण रतन टाटा यांच्या हस्ते झाले. यावेळी मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टमधील विविध महाविद्यालये, विभागांमधील २१ विद्यार्थ्यांनी त्यांना लाल किल्ल्यावर पंतप्रधान यांना ज्या पद्धतीने सलामी दिली जाते तशी सलामी दिली, असे मश्शू सर यांनी सांगितले. या परेडची वैशिष्ट्ये मी त्यांना बाजूला उभे राहून सांगत होतो. अतिशय प्रसन्न मुद्रेने ते याचा आनंद घेत होते. परेडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी फातमा झकेरिया यांनी मकदूम फारूकी यांच्यावर सोपविली होती. या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा मी ठरविली होती. सायंकाळी आयआयएचएम महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभालाही रतन टाटा यांनी हजेरी लावली. हॉटेल ताजमध्ये डिनर करून विशेष विमानाने ते निघून गेले.
के. के. कृष्णकुमार यांची नियुक्ती
टाटा उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर के. के. कृष्णकुमार यांच्यावर रतन टाटा यांनी नवल टाटा स्टेडियम उभारणीची जबाबदारी सोपविली होती. यावेळी कृष्णकुमार यांचे झकेरिया कुटुंबीयांशी जवळीक वाढली. नंतर मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या सदस्यपदीही कृष्णकुमार यांची नेमणूक करण्यात आली होती. डॉ. झकेरिया यांच्या निधनानंतर त्यांनीही ट्रस्टचे कामकाज सोडून दिले.