नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 6, 2023 05:11 PM2023-10-06T17:11:38+5:302023-10-06T17:12:25+5:30
आठ दिवसांनी होणार घरोघरी घटस्थापना
छत्रपती संभाजीनगर : सर्वांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. हा उत्सव म्हणजे देवीची आराधना करण्याचा काळ. अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कर्णपुरा येथील देवीच्या मंदिराची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे तर शहरातील विविध भागांतील देवीच्या १६८ मंदिरात रंगरंगोटीला सुरुवात झाली आहे.
छावणी परिसरात कर्णपुरा यात्रा भरते. ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असते. येथे राज्य परराज्यातील व्यापारी येऊन यात्रेची शान वाढवत असतात. येथील देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज येत असतात. यामुळे येथे गणेशोत्सवापासूनच देवीच्या मंदिराला रंग देणे सुरू झाले होते. आता रंगकाम अंतिम टप्यात येऊन पोहोचले आहे. गाभाऱ्यात सागवानी लाकडावरील कोरीव कामाला सध्या रंग देणे सुरू आहे. या मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बालाजी मंदिरातील रंगकाम उद्यापासून सुरू होत आहे. देवीचे या शिवाय शहरात १६८ मंदिरे आहेत. त्यांनाही रंगरंगोटी केली जात आहे. जळगाव रोडवरील रेणुकामाता मंदिरात फ्लोअरिंगचे पॉलिश करणे संपले आहे. तर बीड बायपासवरील रेणुका माता मंदिरात येत्या दोन दिवसांत देखावा उभारल्या जाणार आहे.
दुर्गादेवीची सर्वाधिक २९ मंदिरे
शहरात मी १ हजार मंदिरांची माहिती संकलित केली. त्यात देवीचे १६८ मंदिर आहेत. त्यातही दुर्गादेवीची सर्वाधिक २९ मंदिरे, तुळजा भवानीची २३ मंदिरे, लक्ष्मी मातेची १८ मंदिरे, कालिकामातेची १२, रेणुकामातेची ११ मंदिरे तर सप्तश्रृंगी देवीच्या ११ मंदिरांचा समावेश आहे. यात काही मंदिरे ३५० वर्षे जुनी तर काही १०० वर्षे जुनी आहेत. तर काही मागील २० वर्षात बांधण्यात आली आहेत.
- प्रो. डॉ. अनिल मुंगीकर, मंदिरांचे अभ्यासक
नावीन्यपूर्ण नावाचे मंदिर
शहरात देवीची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला नाव देण्यात आले आहे. त्यात सिद्धाबिका माता मंदिर, दधीमाता मंदिर, सुसवाणी माता मंदिर, मुत्यालम्मा माता मंदिर, लाखाबाई देवी मंदिर, पाणाजी माता मंदिर, मम्मा देवी मंदिर, सत्तीमाता मंदिर, येडेश्वरी देवी मंदिर, अलक्षित देवतेचे मंदिर अशी नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.