नवरात्रात प्रशासनाची ‘सत्त्वपरीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:11 AM2017-09-18T00:11:05+5:302017-09-18T00:11:05+5:30

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे.

Navratri will be test for administers | नवरात्रात प्रशासनाची ‘सत्त्वपरीक्षा’

नवरात्रात प्रशासनाची ‘सत्त्वपरीक्षा’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे. यामध्ये एकीकडे पोलिसांची डोकेदुखी वाढणार, वाहनधारकांचे हाल होणार, तर दुसरीकडे भक्तांची तारांबळ उडणार आहे. हे संकट सोडविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे; परंतु महामार्ग वळणरस्ता तीन दिवसांत सुरू झाला तर काहीअंशी वाहतूक कोंडी सुटू शकते.
शहरातून जाणाºया सोलापूर-धुळे महामार्गावर असणाºया बार्शी नाका येथील बिंदुसरा नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने वाहतूक बंद केली आहे, तर पर्यायी पूल गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तोडगा काढून अवजड वाहतूक गढी व मांजरसुंबा मार्गे वळविली. तसेच काही वाहने जालना रोडवरील मोंढा टी पॉर्इंटवरून एमआयडीसी, खंडेश्वरी मंदिर परिसर मार्गे तेलगावकडे वळविली. अशीच तेलगाव नाक्याकडून येणारी वाहने वळविण्यात आली आहेत.
दरम्यान, अवघ्या तीन दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. ज्या मार्गे वाहतूक वळविली आहे, अशा मार्गावरच ग्रामदैवत खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर नऊ दिवस मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे रस्त्यावरच काही दुकाने लावली जातात. नवरात्रौत्सवात या परिसरात छोट्या-मोठ्या वाहनांनाही वाहतुकीस मज्जाव करण्यात येतो. केवळ भक्तांना येथे पायी प्रवेश दिला जातो. यामुळे काही अंशी वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश येते; परंतु सद्य:स्थितीत खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ही वाहतूक कोंडी सोडवायची कशी, असा यक्षप्रश्न वाहतूक पोलिसांसह प्रशासनाला पडला आहे.
नवरात्रौत्सवातील बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. वाहतूक वळविण्यासंदर्भात पाहणी केली आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागांना भेटणार आहे. सकारात्मक विचाराने काम सुरू असल्याचे पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Navratri will be test for administers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.