जलवाहिनी पुन्हा फुटली; जुन्या औरंगाबादमध्ये तीन दिवस जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:51 PM2020-11-27T12:51:02+5:302020-11-27T12:51:52+5:30
एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले.
औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी गुरुवारी सकाळी एसएससी बोर्डाजवळ फुटल्यामुळे पुढील तीन दिवस जुन्या शहराला उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता एसएससी बोर्डाजवळ ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले.
कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता के. एम. फालक यांनी तातडीने जलवाहिनीद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद केला. सदरील जलवाहिनी सिमेंटची असल्यामुळे तिची निर्वहन क्षमता संपुष्टात आली आहे. त्या आकाराची पाईप शहरात उपलब्ध नसल्यामुळे तातडीने दुरुस्ती शक्य नाही. त्याकरिता धुळे येथे कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले असून, रिंग व इतर साहित्य आणले जाणार आहे. तोपर्यंत जलवाहिनी बंद असणार आहे.