राष्ट्रवादीच्या एंट्रीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राजकीय भविष्याबाबतही चिंता

By विकास राऊत | Published: July 8, 2023 08:40 PM2023-07-08T20:40:49+5:302023-07-08T20:42:34+5:30

तीन-तीन पक्ष सोबत घेतल्यानंतर पुढील वाटाघाटींबाबतही भाजपतील पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतन करताना दिसत आहेत.

NCP entry uneasiness among BJP workers; Many are also worried about the political future | राष्ट्रवादीच्या एंट्रीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राजकीय भविष्याबाबतही चिंता

राष्ट्रवादीच्या एंट्रीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राजकीय भविष्याबाबतही चिंता

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा एक गट भाजपला येऊन मिळाल्यामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. कार्यकर्ते संभ्रमित झाले असून अनेकांना पुढील राजकीय भविष्याबाबत चिंता वाटू लागली आहे. बूथ सक्षमीकरणासाठी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. राष्ट्रवादीच्या एंट्रीपूर्वी त्यांच्या विरोधात सोशल मीडियासह होर्डिंगबाजी करीत रान पेटविणारे कार्यकर्ते, वॉर्ड पदाधिकारी सध्या ‘न्यूट्रल’ झाल्यासारखे दिसत आहेत.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव नाही. जिल्ह्यातही संघटनात्मक ताकद नाही, असे भाजपतील काही नेत्यांचे मत आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काहीही चिंता करण्याची गरज नाही. महापालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे येणाऱ्या काळातील निवडणुकीत भाजपतील इच्छुकांना झुकते माप मिळेल, असा दावाही काही नेते करीत आहेत. परंतु, कार्यकर्त्यांना याबाबत आता साशंकता वाटू लागली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यामुळे कार्यकर्त्यांना आता कुणाला व कशासाठी विरोध करायचा, असा प्रश्न पडला आहे. तीन-तीन पक्ष सोबत घेतल्यानंतर पुढील वाटाघाटींबाबतही भाजपतील पदाधिकारी, कार्यकर्ते चिंतन करताना दिसत आहेत. भविष्यात आणखी काही निर्णय झाले तर काय करायचे, यावरूनही शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते मंथन करीत असल्याची चर्चा आहे.

हा निर्णय राष्ट्रहितासाठी
राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत घेण्याचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आलेला आहे. ‘एक बार फिर से मोदी सरकार’ हा नारा पूर्ण करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. कुणीही नाराज नाही. फायद्या-तोट्याचा विषय कार्यकर्त्यांमध्ये नाही. बूथ सक्षमीकरणासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करून काम करीत आहेत.
-शिरीष बोराळकर, भाजप शहराध्यक्ष.

कुठेही अस्वस्थता नाही
भाजप कार्यकर्त्यांमध्ये कुठेही अस्वस्थता नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. भाजप विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते डगमगणार नाहीत. केंद्रात मोदी सरकार आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, सगळे नेते एकत्रितपणे काम करीत आहेत.
-विजय औताडे, भाजप जिल्हाध्यक्ष.

Web Title: NCP entry uneasiness among BJP workers; Many are also worried about the political future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.