जोपर्यंत तुमची आपापसातली भांडणं मिटणार नाहीत..; तरूणाने रोहित पवारांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:09 PM2023-08-17T15:09:06+5:302023-08-17T15:09:54+5:30
छत्रपती संभागीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोहित पवारांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद.
छत्रपती संभाजीनगर: सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वादळी दौरे सुरू आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहे तर दुसरीकडे आमदार रोहित पवार विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. छत्रपती संभागीनगरमध्येही एकीकडे शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांवर टीका केली तर दुसरीकडे रोहित पवारांनी तरुणाईशी संवाद साधला.
रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एमपीएससी आयोगाच्या परीक्षा, टीसीएस, आयबीपीएस संस्थांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, सार्थी, बार्टीसारख्या संस्थांकडून विद्यार्थ्यांची होणाली पिळवणूक इ. विषयांवर विद्यार्थ्यांनी रोहित पवारांना विविध प्रश्न विचारले.
तरुणाने रोहित पवारांना सुनावलं
दरम्यान, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरुन एका तरुणाने रोहित पवारांना थेट सुनावलं. 'आमचे प्रश्न कधी मार्गी लागणार. तुमची आपापसातली भांडणं मिटणार नाहीत, तोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत,' असं एका तरुणाने रोहित पवारांना म्हटले. यावर रोहित पवार म्हणाले की, सत्तेसाठी लढणारी माणसं आमच्यातून निघून गेली आहेत. आम्ही इथं राहिलेली माणसं विचारांसाठी लढणारी आहोत. आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे. तुम्ही जसं आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करताय, त्याप्रमाणे आम्हीदेखील आमच्या विचारांसाठी लढतोय.'