औरंगाबाद महापालिकेत महाविकास आघाडीला राष्ट्रवादीचे इच्छुक तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 07:24 PM2020-02-21T19:24:48+5:302020-02-21T19:28:00+5:30
महाविकास आघाडी केल्यास बंडखोरी होईल, असे मत एका इच्छुकाने व्यक्त केले.
औरंगाबाद : महाविकास आघाडी करून मनपा निवडणूक लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार उत्सुक असल्याचे आज येथे स्पष्ट झाले. रात्री ९.१५ वा. राष्ट्रवादी भवनात आल्याबरोबर कसलीही औपचारिकता न पाळता राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी सूत्रे हातात घेऊन ‘महाविकास आघाडी व्हावी असे किती जणांना वाटते’ असा थेट प्रश्न खचाखच भरलेल्या सभागृहासमोर टाकला आणि जवळपास साऱ्याच जणांनी हात वर केले. फक्त तीन- चार जणांनीच काय ते हात वर केले नाहीत. महाविकास आघाडी केल्यास बंडखोरी होईल, असे मत एका इच्छुकाने व्यक्त केले.
रात्र होत होती म्हणून सुप्रिया सुळे यांनी आधी महिलांमधील इच्छुकांशी संवाद साधला. काही जणींनी आपले म्हणणेही मांडले. महिला उमेदवारांसाठी मी आवर्जून सभा घेईन, असे आश्वासन टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी दिले.यावेळी विद्यापीठाच्या मुला-मुलींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलेले होते. त्यांचे निवेदन घेतल्यानंतर त्या मुला- मुलींनाही त्यांनी जायला सांगितले.
पुरुष इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेत असतानाच सुप्रिया सुळे या अल्पोपाहार करू लागल्या. डाएट कंट्रोलचा एक भाग म्हणून कमी व वेळेवर खाण्यावर ताई भर देतात, असे सांगण्यात आले.‘माझ्याजवळ आज भरपूर वेळ आहे असे सांगत सुळे यांनी कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी कैलास पाटील, विजय साळवे, कदीर मौलाना, कमाल फारुकी, रंगनाथ काळे, छाया जंगले, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अचानक घेतली बैठक
दोन दिवसांच्या दौऱ्यात सुळे यांचा औरंगाबादेत फक्त मुक्काम सोडता दुसरा कोणताही कार्यक्रम नव्हता; परंतु अचानक राष्टÑवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या संवादाचा कार्यक्रम घेण्यात आला. कमी वेळ असतानाही कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी भवनात गर्दी केली होती. कन्नडहून येईपर्यंत कार्यकर्ते थांबले होते. हारतुऱ्यांची कोणतीही औपचारिकता यावेळी पाळली गेली नाही. ती पाळू नका असे स्वत: सुप्रिया सुळे यांनी सांगून ठेवलेले होते.