‘राष्ट्रवादी’कडून १०२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजारांची मदत
By Admin | Published: May 31, 2016 12:05 AM2016-05-31T00:05:20+5:302016-05-31T00:09:47+5:30
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली.
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली. लातूर जिल्ह्यातील १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खरीप पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप सोमवारी करण्यात आले.
मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात धनादेशाचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मंचावर माजी खा.डॉ.जनार्दन वाघमारे, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, बस्वराज पाटील नागराळकर, प्रा.एन.बी. शेख, अशोक गोविंदपूरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, रेखा कदम, आशा भिसे, युवक अध्यक्ष चंदन पाटील, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात आलेले भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. देशाचे पंतप्रधान साडेसातशे दिवसांपैकी चारशे दिवस विदेश दौऱ्यावरच आहेत. महाराष्ट्र शासनाकडूनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक विभाग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन आला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उद्याच्या पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली आहे. (प्रतिनिधी)