नाशिक,नगरमधून पाणी सोडा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जायकवाडी धरणात जल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:55 PM2018-10-22T13:55:46+5:302018-10-22T13:57:34+5:30
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले.
औरंगाबाद : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात जल आंदोलन केले. माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पुढील १० दिवसात पाणी सोडण्यात आले नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्र व धरणाच्यावरील बाजूस यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरणात जेमतेमच पाणीसाठा शिल्लक आहे. या दुष्काळी परिस्थितीत आमागी काळात मराठवाड्यावर भीषण पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. यावर गोदावरी पाटबंधारे विभागाने बैठक घेऊन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरणात ७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे विभागाने जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावे, तसेच येत्या दहा दिवसात धरणात १२ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने धरणात जल आंदोलन केले.
माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात तालुका अध्यक्ष विजय गोरे, शहराध्यक्ष भाऊ निवारे, नगरसेवक जितु परदेशी, इरफान बागवान, ज्ञानेश घोडके, अरुण पाटील काळे, रघुनाथ ठोबरे, डॉ. गुलदाद पठाण, अनिल हजारे, गोविंदतात्या शिंदे, विशाल वाघचौरे, भाऊसाहेब तरमळे आदींचा सहभाग होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जलतरण पथक, अग्निशमक पथक व पोलीस निरीक्षक चंदन इमले, सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह पोलीस कर्मचारी, अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अभियंता अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.