राष्ट्रवादीचे ‘मोहरे’ भाजपाच्या गळाला!

By Admin | Published: September 1, 2014 12:26 AM2014-09-01T00:26:39+5:302014-09-01T01:09:45+5:30

बीड :जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे खेचण्यासाठी आ. पंकजा मुंडे यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादीतील काही नाराज सदस्य भाजपाच्या संपर्कात आहेत.

NCP's 'Pieces' BJP! | राष्ट्रवादीचे ‘मोहरे’ भाजपाच्या गळाला!

राष्ट्रवादीचे ‘मोहरे’ भाजपाच्या गळाला!

googlenewsNext

 

बीड :जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे खेचण्यासाठी आ. पंकजा मुंडे यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादीतील काही नाराज सदस्य भाजपाच्या संपर्कात आहेत. यापैकी महत्त्वाचे मोहरे टिपून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा देण्यासाठी भाजपाने हालचाली सुरु केल्या आहेत. आ. पंकजा मुुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२) भाजपा सदस्यांची बैठक होत आहे. त्यात सत्तांतराची रणनीति ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणण्याची घोषणा केली होती. जिल्हा परिषदेत एकेकाळी गोपीनाथराव मुंडे यांचा एकछत्री अंमल होता. त्यांनी केलेली सत्तांतराची घोषणा सत्यात उतरविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा आ. पंकजा मुंडे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.
जि़प़ मध्ये राष्ट्रवादीचे ३६ तर सेना-भाजपा-रासपा युतीचे २३ सदस्य आहेत़ यापैकी राष्ट्रवादीच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. सत्तांतरासाठी भाजपाला ३० सदस्यांची आवश्यकता आहे़ दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आ़ विनायक मेटे राष्ट्रवादीपासून दुरावले. माजी आ़ भीमराव धोंडे, माजी आ़ साहेबराव दरेकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपाचा आश्रय घेतला. मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के, माजी आ़ धोंडे यांचे बंधू बापूराव धोंडे, माजी आ़ दरेकर यांचे पुत्र उद्धव दरेकर हे तिघेही आता राष्ट्रवादीपासून वेगळे झाले आहेत. संख्याबळ वाढल्याने सत्तांतराचा ‘जादूई’ आकडा गाठण्याचा विश्वास भाजपाला आहे. २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. मदनराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा खुद्द गोपीनाथराव मुंडे यांनीच लोकसभा निवडणुकीत केली होती. जयश्री मस्के, उद्धव दरेकर ही नावेही ‘लाल दिव्या’साठी चर्चेत आहेत. मात्र, आ. पंकजा मुंडे ठरवतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होईल.
केजमधील नेता भाजपाच्या संपर्कात!
केज तालुक्यातील राष्ट्रवादीचा महत्त्वाचा नेता भाजपाच्या संपर्कात आहे. मुंबईत त्यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतली असून प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. बडे प्रस्थ असलेल्या या नेत्याने भाजपात प्र्रवेश केल्यास जि.प. सत्तांतराचा मार्ग मोकळा होईल़ त्यांच्याकडे हक्काचे शिलेदार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशास सकारात्मक प्रतिसाद आहे़ तसे झाल्यास राष्ट्रवादीला जबरदस्त ‘हाबाडा’ बसेल. भाजपात प्रवेशासाठी या नेत्याने उमेदवारी मागितली आहे; परंतु त्यांना जि.प.त महत्त्वाचे पद देऊन समाधान केले जाऊ शकते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी त्यांचा 'रूबाब’ कायम राहील़
भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, गोपीनाथराव मुंडे यांनी जि.प. सत्तांतराचे स्वप्न पाहिले होते. ते साकारण्यासाठी आ. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखली जाईल. जि.प. च्या विकासकामांतील गैरव्यवहारामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी आहे. काही सदस्य भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सत्तांतर अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.
युतीच्या सदस्यांचा आकडा आता २३ वरुन २६ वर पोहोचला आहे़ याशिवाय लोकसभा निवडणुकीतच गेवराई तालुक्यातील स्वाभिमानीच्या दोन सदस्यांनी मुंडेंचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे ते भाजपाशी जोडलेले गेलेले आहेत. ते दोेघेही भाजपात आले तर युतीचे संख्याबळ २८ वर जाईल. याशिवाय आष्टी तालुक्यातील दोन तर केज तालुक्यातील काही सदस्य राष्ट्रवादी सोडून भाजपात येण्यास उत्सूक आहेत. तसे झाल्यास महायुती ३० चा 'जादूई' आकडा पार करुन ३६ हे भक्कम संख्याबळ प्राप्त होऊ शकते.

Web Title: NCP's 'Pieces' BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.