राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार

By विकास राऊत | Published: February 3, 2023 07:31 AM2023-02-03T07:31:33+5:302023-02-03T07:33:35+5:30

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात 'विक्रमी' विजयाचा चौकार आवश्यक मतांचा कोटा अपूर्ण; मात्र बाद फेरीसाठी उमेदवार नसल्याने विक्रम काळे विजयी घोषित

NCP's Vikram Kale's Victory for the fourth time in a row in the Marathwada teachers' constituency | राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार

राष्ट्रवादीने गड राखला! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विजयाचा ' विक्रमी ' चौकार

googlenewsNext

औरंगाबाद: महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ.विक्रम काळे यांनी चौथ्यांदा मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर विजयाचा झेंडा फडकाविला.

शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आ.काळे यांना पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते मिळाली त्यानंतर प्रत्येक फेरीअंती त्यांची मते वाढत गेली. मात्र विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. तेराव्या फेरी अखेर २३ हजार ५७७ मते घेत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना पराभवाची धूळ चारली. पाटील यांना १६ हजार ६४३ मते मिळाली. पहिली पसंतीची मतमोजणी संपल्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. २५३८६ मतांचा कोटा विजयी होण्यासाठी निश्चित केला होता. १७ तास मतमोजणी प्रक्रिया चालली.

२००६ साली आ.काळे पहिल्यांदा या मतदारसंघात निवडून आले. तेव्हापासून त्यांनी मतदारसंघावर वर्चस्व राखले. यावेळच्या निवडणुकीत तर त्यांनी प्रचार कार्यालय देखील सुरू केलेले नव्हते. शिक्षकांशी असलेल्या थेट संपर्कावर त्यांनी विजयश्री खेचली. भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेेली मेहनत फळाला आली नाही. या सगळ्यात चमत्कारी मते घेण्यात शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी बाजी मारली. संघटनेच्या नेटवर्कवर त्यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला अखेरच्या फैरीपर्यंत पुढे येऊ दिले नाही.

 सकाळी आठ वाजता कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. या कंपनीच्या आवारात मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी ३ वाजेपर्यंत पहिल्या पसंतीची मतमोजणी पुर्ण झाली. यात ५३ हजार २५६ मतांची मोजणी झाली. त्यात २ हजार ४८५ मते अवैध ठरली. ५० हजार ७७१ मते वैध ठरली. विजयासाठी लागणारा कोटा कुठल्याही उमेदवाराला पुर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसर्या पसंतीची मते मोजून कोटा पुर्ण करण्याची प्रक्रिया सुरू झाली.  स्व. वसंतराव काळे यांची गुरुवारी पुण्यतिथी होती. त्याच दिवशी विक्रम काळे यांचा चौथ्यांदा या मतदारसंघात विजय झाला. यामुळे काळे यांना अश्रू अनावर झाले होते.

विश्वासरावांची मते दोघांना जवळपास सारखीच
सूर्यकांत विश्वासराव यांची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले होते. त्यांची पूर्ण मते मोजण्यास रात्री सव्वा अकरा वाजले. विश्वासराव यांची २ हजार ४७५ मते विक्रम काळे यांना तर २ हजार ४६१ मते प्रा. किरण पाटील यांना वर्ग झाली. त्यामुळे १३ व्या फेरी अखेर विक्रम काळे २३ हजार ५७७ मतांवर पोहचले. तर भाजपचे प्रा. किरण पाटील हे एकूण १६ हजार ६४३ मतांवर पोहोचले.ल. १३ व्या फेरी पूर्ण होऊनही २५ हजार ३८६ मतांचा कोटा पूर्ण झालाच नव्हता. तरीही सर्वाधिक मते घेतलेले विक्रम काळे यांना विजयी घोषीत केले.

Web Title: NCP's Vikram Kale's Victory for the fourth time in a row in the Marathwada teachers' constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.