ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला
By राम शिनगारे | Published: August 4, 2023 11:26 AM2023-08-04T11:26:06+5:302023-08-04T11:26:56+5:30
नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लेखकांना देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होते; मात्र मराठवाड्यातील साहित्यातील सर्वोच्च संस्था असलेली मराठवाडासाहित्य परिषद कोणत्याही साहित्यिकांचा सन्मान करीत नव्हती. ना.धों. महानोर हे ‘मसाप’चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील. हा निर्णय महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला होता.
अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन झाल्यानंतर अडचणीच्या प्रसंगामुळे ना.धों. महानाेर यांना ‘मसाप’चे अध्यक्षपद स्वीकारावे लागले होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ‘मसाप’मध्ये अनेक बदल घडवून आणले. सुरुवातीलाच त्यांनी मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची सुरुवात केली. त्याशिवाय महानोरांच्या काळात ‘मसाप’च्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृहाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या जमवाजमवीला सुरुवात केली. त्यातून सभागृहाची पायाभरणी झाली.
पुढे या सभागृहाचे काम विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. आज हे सभागृह साहित्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार ठरत आहेत. त्याची सुरुवात महानोरांनीच केली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या विकासामध्ये योगदान दिले. शासनदरबारी आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा केला. महानोरांनी सुरू केलेल्या पुरस्कारानंतर ‘मसाप’तर्फे विविध पुरस्कार देण्याची परंपराही सुरू झाली. ही परंपरा अद्यापही कायम आहे. उलट त्यात भरच घालण्यात आली आहे.