आवश्यक आहे, जाहिरात विभागाकडून फोन होता. जातवा ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:05 AM2021-01-20T04:05:37+5:302021-01-20T04:05:37+5:30
नऊपैकी सात जागा जिंकून भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आळंद : फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील काँग्रेसच्या ...
नऊपैकी सात जागा जिंकून भाजपाचे निर्विवाद वर्चस्व
आळंद : फुलंब्री तालुक्यातील जातवा येथील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतवर यंदाच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले असून, ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. माजी सरपंच तान्हाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे नऊपैकी सात उमेदवार विजयी झाले आहे. काँग्रेसचे विद्यमान सरपंच गणेश पवार यांच्या जनसेवा ग्रामविकास पॅनलविरुद्ध भाजपाचे कार्यकर्ते व माजी सरपंच तान्हाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
दोन्ही पॅनलकडून गावाच्या विकासाचा जाहीरनामा विकसीत करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गेल्या पंधरा वर्षांपासून ही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. यावेळी मात्र, मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे माजी सरपंच तान्हाजी पवार व त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांना पसंती देत, मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. विद्यमान सरपंच गणेश पवार यांचा ३९ तर अनिता संजय जाधव यांचा अवघ्या २ मतांनी निसटता विजय झाला. त्यांना दोनच जागेवर समाधान मानावे लागले. परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे देवीदास रावते, कविता पवार, ज्योती पवार, तान्हाजी पवार, शशिकला पवार, सिंधु बनकर, मनिषा रावते यांचा विजय झाला, तर जनसेवा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार व विद्यमान सरपंच गणेश पवार व अनिता जाधव हे दोन उमेदवार विजयी झाले.
फोटो ओळ : जातवा ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळाल्यानंतर मतदारांचे आभार मानताना माजी सरपंच तान्हाजी पवार व उमेदवार.