‘अमृत’ सेवा गोठलेलीच !
By Admin | Published: May 19, 2014 12:31 AM2014-05-19T00:31:09+5:302014-05-19T01:31:29+5:30
हरी मोकाशे, लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़
हरी मोकाशे, लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत सेवेद्वारे केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ खाजगी रक्तपेढीतून रक्त पुरवठा होण्याची संख्या मात्र ११ हजार ४०१ पेक्षा जास्त आहे़ जनजागृतीच झाली नसल्याने रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांना अल्प दरात तात्काळ रक्त मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाच्या अंतर्गतच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने गेल्या डिसेंबरपासून जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ अपघात अथवा गंभीर आजारी असलेल्या रुग्णास रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होऊ नये़ तसेच खाजगी रक्तपेढीतून आर्थिक लूट केली जाऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे़ १०४ या टोल फ्री क्रमांकावरुन देण्यात येणारी ही सेवा प्रत्यक्षात राज्यात जानेवारीपासून सुरु झाली आहे़ रुग्णाने अथवा त्यांच्या नातेवाईकाने टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन रुग्णालयाचे नाव, संपूर्ण पत्ता, माहिती असल्यास रक्तगट, रक्त अथवा रक्तघटक यापैकी कशाची आवश्यकता आहे, त्याची माहिती देणे अपेक्षित आहे़ या क्रमांकावर भ्रमणध्वनीवरुन कॉल केल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत रक्तपुरवठा केला जातो़ या सेवेसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणाही उभी करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यासाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ही यंत्रणा असून तेथून ४० किमीपर्यंतच्या रुग्णास रक्त पुरवठा केला जातो़ लातूर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खाजगी चार रक्तपेढ्या आहेत़ जीवन अमृत सेवा योजनेअंतर्गत ५०० रूपयांपर्यंत रक्तपिशवी मिळते़ खाजगी रक्तपेढीत याचा दर जवळपास दुप्पट दर आहे़ ही सेवा सुरु होऊन जवळपास साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला असताना आजपर्यंत केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ त्याच्या तुलनेत खाजगी रक्तपेढ्यांतून ११ हजार ४०१ रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे़ मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेल्या या सेवेची अद्यापही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांमध्ये जनजागृतीच झालेली नसल्याचे दिसून येत आहे़ डॉक्टरांनी रुग्णास रक्ताची आवश्यकता आहे, असे सांगितले असता रुग्णांचे नातेवाईक खाजगी रक्तपेढींकडे धाव घेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे़ परंतु, सामान्यांना योजनेसंदर्भात माहितीच नसल्याने प्रतिसाद मिळत नाही़ मागणीनुसार रक्तपुरवठा करण्यात येत असल्याचे जीवन अमृत सेवेतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जी़ आऱ मुसांडे यांनी सांगितले़ खाजगी डॉक्टरांची अडचण़़़़ ही सेवा आपल्या रुग्णालयातील रुग्णांना देण्यासाठी खाजगी डॉक्टरांना आपल्या दवाखान्याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते़ त्याचबरोबर या सेवेतंर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते़ दवाखान्याची माहिती शासनाकडे सादर होणार असल्याने खाजगी डॉक्टर दुसर्यासाठी आपल्या मागे कटकट नको म्हणून तात्काळ रक्ताची गरज आहे़ ते कुठुनही उपलब्ध करावे असे सांगून हात झटकतात़