आयुक्त देण्याची मागणी प्रधान सचिवांकडे करावी; माजी सनदी अधिकाऱ्यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 07:10 PM2019-11-19T19:10:46+5:302019-11-19T19:18:00+5:30
आजही मनपातील सत्ताधाऱ्यांनी प्रधान सचिवांकडे आपले म्हणणे मांडले तर त्वरित अधिकारी नियुक्त होऊ शकतो, असा विश्वास माजी सनदी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
औरंगाबाद : शासनातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्या घेण्यासाठी जे नियम ठरवून दिले आहेत, तेच नियम सनदी अधिकाऱ्यांनाही लागू होतात. सनदी अधिकाऱ्यांसाठी काही वेगळे नियम नाहीत. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुटीवर जाण्याचा अधिकार आहे. ते कोणालाही थांबविता येत नाही. मात्र, सुटीवर गेलेल्या अधिकाऱ्याच्या जागेवर त्वरित दुसरा अधिकारी नेमण्याचे कर्तव्य संबंधित विभागप्रमुखांचे आहे. मनपा आयुक्त दीर्घ सुटीवर गेले म्हणून शहर वाऱ्यावर सोडता येत नाही. आजही मनपातील सत्ताधाऱ्यांनी प्रधान सचिवांकडे आपले म्हणणे मांडले तर त्वरित अधिकारी नियुक्त होऊ शकतो, असा विश्वास माजी सनदी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
२४ आॅक्टोबरपासून मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक दीर्घ सुटीवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार शासनाने कोणाकडेच दिलेला नाही. काही दिवस जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार दिला होता. आयुक्तांनी आणखी सुटी वाढविल्यानंतर शासनाने सुधारित आदेशच काढलेले नाहीत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून मनपाला आयुक्तच नाही, अशी अवस्था आहे. शहरात डेंग्यूने ११ जणांचा बळी घेतला. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करणे आदी अत्यंत महत्त्वाची आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याची अनेक कामे रखडली आहेत.
दरम्यान, ‘लोकमत’ने शहरातील काही माजी सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सनदी अधिकाऱ्यांनाही १ महिना अर्जित रजा, नियमित रजा, वैद्यकीय रजा घेण्याचे अधिकार आहेत. अनेक अधिकाऱ्यांच्या शिल्लक रजा असतात. त्या केव्हाही घेता येऊ शकतात. रजा घेऊ नका असे कोणी सांगू शकत नाही. सुटीवर गेलेल्या अधिकाऱ्याच्या जागेवर त्वरित दुसरा अधिकारी नेमणे हे शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे.
निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी नमूद केले की, नगरविकास विभागाच्या सचिवांची ही जबाबदारी आहे की, निपुण विनायक सुटीवर जाताच त्यांच्या जागेवर दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करायला हवी होती. आता राज्यपालांकडे मागणी करून काहीच उपयोग नाही. प्रधान सचिवांकडे आपले गाºहाणे सत्ताधाऱ्यांनी मांडल्यास त्वरित दुसरा अधिकारी नियुक्त होऊ शकतो.
आयुक्तांच्या ६० पेक्षा अधिक रजा
मागील चार महिन्यांमध्ये आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ६० पेक्षा अधिक रजा घेतल्या आहेत. सुटीवरून आयुक्त परत येण्याची कोणतीच शक्यता नाही. शासनाने त्वरित दुसरा अधिकारी द्यावा, अशी मागणी राजकीय मंडळींकडून जोर धरत आहे.
आयुक्तांचा पदभार माझ्याकडेच : जिल्हाधिकारी
महापालिका आयुक्त पदाचा पदभार सध्या तरी माझ्याकडेच आहे. प्रभारी पदभार जरी माझ्याकडे असला तरी पालिकेच्या कोणत्याही धोरणात्मक संचिकांवर मी स्वाक्षरी करणार नाही. नियमित प्रभारी पदभाराचे १० नोव्हेंबरपर्यंत आदेश होते. त्यापुढील काळासाठी प्रभारी पदभार देण्याचे कोणतेही आदेश शासनाकडून आलेले नाहीत. त्यामुळे मी संचिकांवर स्वाक्षरी करण्याचे कायदेशीर अधिकार माझ्याकडे सध्या तरी नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
विभागीय आयुक्त म्हणाले
जोपर्यंत आयुक्त डॉ. निपुण हे रुजू होणार नाहीत, तोपर्यंत मनपा आयुक्त पदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडेच आहे. नियमित आयुक्त रुजू होईपर्यंत ते काम पाहतील. बाकी इतर माहिती ऐकीव आहे, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले.