सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:36 AM2019-06-13T03:36:36+5:302019-06-13T03:37:04+5:30
ईव्हीएम मशीनमध्ये नक्की घोटाळा झाला आहे.
औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते. लवकरच आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या १५ ते २० जागा लढविण्यास उत्सुक आहे. मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय घेतलेला नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएम मशीनमध्ये नक्की घोटाळा झाला आहे. आम्ही दिलेले मत योग्य ठिकाणी जात नाही, हे वारंवार सिद्ध होत चाललेय; पण ना निवडणूक आयोग हे लक्षात घ्यायला तयार आहे ना सर्वोच्च न्यायालय. दोघांनीही आमच्यासह २२ पक्षांचे म्हणणे फेटाळले आहे, याकडे लक्ष वेधत राजू शेट्टी यांनी सांगितले की, मी भाजपची साथ सोडली याचा मला जराही पश्चात्ताप नाही. कारण हे सरकार शेतकरीविरोधी आहे, याबद्दल वादच नाही. यांच्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या. कधी नव्हे एवढा कृषी खात्याचा जीडीपी ३ टक्क्यांपेक्षा खाली गेला, असेही ते यावेळी म्हणाले.
...तर बेमुदत घेराव
माझा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी मी संघर्ष करीतच राहणार! सुरुवातीला भाजपशी दोस्ती करून पाहिली. कुंभाराने मडके घडवले; पण ते एवढे कच्चे निघेल, हे त्याला काय माहीत, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता शेट्टी यांनी मारला.