शहरातून मुंबईसाठी नव्या विमानसेवेची गरज स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:05 PM2019-09-03T19:05:35+5:302019-09-03T19:06:08+5:30
पहिल्याच दिवशी १३० प्रवासी रवाना
औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासाच्या निमित्ताने एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी चालविण्यात येणाऱ्या औरंगाबाद-मुंबई विमानाला रविवारी (दि. १) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विमानाने १३० प्रवासी मुंबईला गेले. त्यामुळे शहरातून मुंबईसाठी नव्या विमानाची किती गरज आहे, हे समोर आले आहे.
हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी दिल्ली-औरंगाबाद विमानसेवा चालविण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासामुळे १ सप्टेंबरपासून ७ दिवसांसाठी एअर इंडियाकडून औरंगाबाद- मुंबई विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. १ सप्टेंबरनंतर आता ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३०, ५ सप्टेंबर रोजी पहाटे २.०५ वा., ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वा., ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३५ वा., ८ व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३५ वाजता हे विमान राहील.
या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी रविवारी १३० प्रवासी मुंबईला गेले. दुसऱ्या उड्डाणासाठी म्हणजे ४ सप्टेंबरला ७७ प्रवाशांची बुकिंग झालेली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे औरंगाबादला सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी होती. आता मुंबईसाठी एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. तेदेखील सायंकाळी. एकाच विमानामुळे अधिकच्या तिकिटदरालाही प्रवाशांना सामोरे जावे लागते. एअर इंडियाकडून १६ आॅक्टोबरपासून मुंबई - औरंगाबाद -उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. यामुळे उदयपूरसह मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या विमानसेवेबरोबर मुंबईसाठी दररोज आणखी विमानसेवेची गरज असल्याचे सात दिवसांच्या विमानसेवेवरून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
‘इंडिगो’कडे लक्ष
इंडिगोने औरंगाबादहून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी केली आहे. ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीकडून नेमकी कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरूकेली जाते, याकडे लक्ष लागले आहे.