संपूर्ण मानवजातीला शांतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:04 AM2018-01-14T00:04:17+5:302018-01-14T00:04:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मानवाने मागील काही वर्षांमध्ये अशक्यप्राय अशी क्रांती संशोधनाच्या माध्यमातून घडवून आणली आहे. या क्रांतीसोबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मानवाने मागील काही वर्षांमध्ये अशक्यप्राय अशी क्रांती संशोधनाच्या माध्यमातून घडवून आणली आहे. या क्रांतीसोबत मानवाला शांतीची खूप गरज आहे. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी शांती मिळायला तयार नाही. इस्लाम धर्माचे अत्यंत बारकाईने अध्ययन केल्यास शांतीचा मार्ग सापडेल, असे मत जमात-ए-इस्लामी हिंदचे अजीज मोईनोद्दीन यांनी व्यक्त केले.
जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे १२ जानेवारीपासून ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, जे. के.जाधव, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, लेखक डॉ. इक्राम अहेमद, डॉ. शादाब मुसा, इलियास खान फलाही, इम्रान अहेमद खान आदींची उपस्थिती होती. यावेळी अजीज मोईनोद्दीन पुढे म्हणाले की, जगभरात अशांतता पसरली आहे. मानवाने सुख-सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. अशक्यप्राय गोष्टी आता मानव काही सेकंदात करू शकतो. विज्ञानाच्या देणगीनंतरही त्याला शांती मिळायला तयार नाही. शांतीसाठी तो कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहे. खरी शांती हवी असेल, तर एकदा इस्लामचे बारकाईने अध्ययन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विज्ञानात गरुडझेप घेणाºया मानवाच्या चारित्र्य संवर्धनाचा आलेख शून्यावर आला आहे. वर्तमानपत्र उघडल्यावर समाजात जिकडे-तिकडे अराजकता पसरल्याचे दिसून येते. माणूस दिवसेंदिवस क्रूर होत चालला असल्याचे जाणवत आहेत. आज संपूर्ण मानवजातीला शांततेची गरज आहे. यासाठी सर्वांनी मिळून समाजातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करायला हवा, असे डॉ. इक्राम अहेमद यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात मुनाफ शाह यांनी चरित्र धर्मग्रंथाच्या पठणाने केली. प्रास्ताविक अफसर शेख यांनी केले. यावेळी देवसिंग पवार, सुनील वाघ उपस्थित होते. इलियास फलाही यांनी दुआ केली. आभार जव्वाद कादरी यांनी मानले.