राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज
By Admin | Published: June 17, 2014 12:06 AM2014-06-17T00:06:54+5:302014-06-17T01:14:27+5:30
जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली
जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली असून, या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे.
घाणेवाडी जलाशयापासूनच कुंडलिका नदी वाहते अशी अनेकांची धारणा आहे, परंतु नदीचा उगम हा अजिंठा डोंगरातून झाला आहे. घाणेवाडी, निधोना पुढे रामतीर्थपर्यंत नदीपात्रास आता बऱ्यापैकी स्वरूप आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्याचा पुढाकार त्यास कारणीभूत आहे. परंतु, रामतीर्थपासून ते मंठा बायपासपर्यंत पुढे दुधना नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरून संयुक्त तसेच नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांकडून वारंवार ओरड होऊनसुद्धा काडीचेही प्रयत्न होत नाहीत. हे दुर्दैव आहे.
कुंडलिका नदीवर निधोना व रामतीर्थ या दोन ठिकाणी शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम यशस्वीरित्या झाले. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी-उद्योजकांनी अवलंबिलेला सकारात्मक दृष्टीकोनच कारणीभूत ठरला. आता ही या नदीवरच शिरपूर पॅटर्नवर आधारीत सहा बंधारे उभारले जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून नदीवरील लोकेशन निश्चित झाले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यास मिळाली आहे. आता, त्याचे कामही निविदास्तरावर आहे.
एकूण वर्षभराखेर त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज आहे. या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होईल, शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईलच. परंतु, रामतीर्थपासून जुना व नवीन जालन्यातील बहुतांश वसाहतींमधून जाणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाकरीता याच पद्धतीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आजपर्यंत सरकारी पातळीवरून काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. पालिका प्रशासनानेसुद्धा या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणासंदर्भात खऱ्या अर्थाने विचारसुद्धा केला नाही. उलटपक्षी या दोन्ही नद्यांमधून संपूर्ण शहराचे सांडपाणी व केरकचऱ्याची विल्हेवाट लावून नद्या बकाल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अलिकडे तर या नद्यांमधून केरकचऱ्यासह माती-मुरूमाचा भराव टाकून जागाच हडप करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्याकडेही पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पद्धतशीरपणे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही नद्यांचे हे पात्र अरूंद होणार व या नद्यांना मोठ्या नाल्याचे स्वरूप येणार, हे स्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर या दोन्ही नद्या वाचविण्याकरीता हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कामांना वेग येणार नाही, हेच स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या दोन्ही नद्या वाहत्या केल्या, त्याचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे स्वरूप बदलू शकते, परंतु त्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्ती जागी झाल्यास या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग सहजपणे सुलभ होईल. दोन्ही नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल व शहरातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पुनरूज्जीवीत होतील, हे निश्चित.