साहित्य संमेलनातून परिवर्तननिष्ठ जाणिवा मांडण्याची गरज
By Admin | Published: January 1, 2017 11:37 PM2017-01-01T23:37:38+5:302017-01-01T23:47:24+5:30
लातूर : अस्मितादर्श वाङ्मयीन चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत
लातूर : अस्मितादर्श वाङ्मयीन चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सृजनशील तत्वज्ञान वाङ्मयीन स्वरुपातून पुढे नेण्यासाठी ‘अस्मितादर्श’चा जन्म झाला आहे. परिवर्तननिष्ठ जाणिवा साहित्य संमेलनातून मांडणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लातुरात १४ व १५ जानेवारी रोजी ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त डॉ. पानतावणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अस्मितादर्श साहित्य संमेलनात मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जात नाहीत. सर्व कार्यक्रम बौद्धिक व वैचारिक स्वरुपाचे असतात. लेखक, वाचक संवाद, काव्य संमेलन, परिसंवाद, शोधनिबंध आदी कार्यक्रम या साहित्य संमेलनात होणार आहेत. ‘अस्मितादर्श’चे साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांची कार्यशाळा आहे. पीडितांना बांधून ठेवणारी व्यवस्था, मनुषत्व नाकारणे यावर अस्मितादर्शच्या साहित्यिकांनी प्रहार केला. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास व नवीन जाणिवा तयार करणे हे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातून आलेल्या ‘अस्मितादर्श’ या वाङ्मयीन नियतकालिकाने मूल्याधिष्ठित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले आहे. आंबेडकरवादी साहित्याचा ध्येयवाद परजणाऱ्या अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारीला लातूरला होत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गादेकर, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, कार्याध्यक्ष प्रा. सुधीर अनवले, उपाध्यक्ष प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, कार्यवाह डॉ. अशोक नारनवरे, कोषाध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर, राजेंद्र लातूरकर, डॉ. विजय अजनीकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)