संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज : गणेश देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:10 PM2019-11-04T20:10:09+5:302019-11-04T20:12:30+5:30
येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे.
औरंगाबाद : येत्या काही काळात ‘सिटीझनशिप अमेंडमेंट बिल’ मांडले जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगणिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात येणाऱ्या ख्रिश्चन, हिंदू, बुद्धिस्ट, पारशी किंवा जैन नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा उल्लेख आहे; परंतु यामध्ये ज्यू आणि मुस्लिम यांचा उल्लेख कटाक्षाने टाळला गेला आहे. हे खूप गंभीर असून, ज्याप्रमाणे गांधीजी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह केला होता, त्याचप्रमाणे आता आपण याविरुद्ध उठाव करून संपूर्ण नागरिकत्वाचा विडा उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले.
श्यामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. गणेश देवी यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार, तर कला संस्कृती वारसा अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांना इंद्रायणी बोधनकर पुरस्कार रविवारी सायंकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लढ्ढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. राजाराम राठोड, स्वातंत्र्यसैनिक ना.वि. देशपांडे, राघवेंद्र चाकूरकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.सुरुवातीला अॅड. अभय राठोड, प्रवीण बोबडे यांनी स्फूर्तिगीत सादर केले. श्रीकांत उमरीकर यांनी संचालन केले. सुजाता जोशी-पाटोदेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.
वडील आणि पतीच्या पाठिंब्याने घडले
लहानपणी वडील आम्हा बहिणींना घेऊन आवर्जून भारतभर विविध लेण्या पाहायला न्यायचे आणि त्याबाबतची सखोल माहिती द्यायचे. त्यांच्यामुळेच या लेण्या माझ्या डोक्यात भिनल्या आणि वडिलांनी याबाबतीत दाखविलेल्या सातत्यामुळेच मी घडत गेले. यानंतर पती रफत कुरेशी यांनीही माझ्या कामाला पाठिंबा दिला आणि माझे काम टिकून राहिले, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. डॉ. दुलारी यांनी औरंगाबादच्या इतिहासाविषयी सखोल माहिती देणारे एक पुस्तक लिहावे, असे ताराबाई यांनी सुचविले.