शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे; पण ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक नको: आदित्य ठाकरे
By संतोष हिरेमठ | Published: September 4, 2024 12:16 PM2024-09-04T12:16:18+5:302024-09-04T12:18:16+5:30
आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सण येत आहेत. शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पंचनामे होतील. पण मागच्या प्रमाणे कुठे ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक, अस यावेळी होऊ नये, असे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडयात मोठया प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमचे पाहिले ध्येय हे महाराष्ट्र द्रोही भाजपाला हद्दपार करणे आहे, प्रत्येक जागेवर चर्चा होईल. कोणीही मुख्यमंत्री पदासाठी लढत नाही, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यासाठी रस्त्यावर आलेली भाजपा नेते आता कुठं आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मध्य मार्ग काढला पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.