मुलीच्या डोक्यात सुईचा तुकडा
By Admin | Published: August 13, 2014 12:25 AM2014-08-13T00:25:10+5:302014-08-13T00:54:04+5:30
उस्मानाबाद : एका २३ दिवसांच्या मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याचे गंभीर प्रकरण सोमवारी समोर आले आहे़ मुलीच्या पालकांनी खासगी
उस्मानाबाद : एका २३ दिवसांच्या मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याचे गंभीर प्रकरण सोमवारी समोर आले आहे़ मुलीच्या पालकांनी खासगी रूग्णालयासह जिल्हा रूग्णालयात मुलीला दाखविल्यानंतर हा प्रकार आमच्या इथे झालाच नाही, असे उत्तर देत संबंधितांनी हात वर केले आहेत़ मात्र, मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याने घाबरलेल्या पालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे़
याबाबत अधिक वृत्त असे की, उस्मानाबाद तालुक्यातील तुगाव येथील संजय हनुमंत गडकर यांच्या पत्नी वर्षा यांना १८ जुलै रोजी शहरातील एका खासगी रूग्णालयात मुलगी झाली़ मात्र, वर्षा यांची प्रसूती सिझेरियनव्दारे झाली होती़
जन्मानंतर मुलीची प्रकृती चांगली नसल्याने काचेत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला़ त्यासाठी खासगी रूग्णालयाचे पत्र देवून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़ तीन दिवसानंतर त्या मुलीस पुन्हा खासगी रूग्णालयात आणण्यात आले़ तेथे उपचार सुरू असताना काविळ असल्याची लक्षणे सांगत पुन्हा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़ दोन दिवस तेथे उपचार घेतल्यानंतर मुलीस डिस्चार्ज देण्यात आला़ घरी आल्यानंतर मात्र, लहान मुलगी सतत रडत होती़ तिचे रडणे थांबत नसल्याने पालक घाबरून गेले होते़ ९ आॅगस्ट रोजी सकाळी तिच्या डोक्यात जखम असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले़ १० आॅगस्ट रोजी त्या जखमेच्या जागी पू येत असल्याने थोडे दाबले असता इंजेक्शनच्या सुईचा तुकडा बाहेर आला़ या प्रकाराने आई वडिल प्रचंड घाबरून गेले. पित्याने तातडीने सोमवारी जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालय गाठले़ त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली़ मात्र, सदरील प्रकार आमच्या रूग्णालयात घडलाच नाही, असे सांगत हात वर केले़ मात्र, मुलीच्या डोक्यात इंजेक्शनची सुई घुसल्याने भविष्यात तिला डोक्याचा आजार होण्याची भीती पालकांना सतावत आहे़ शिवाय भविष्यातील अशा प्रकाराला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित करीत जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयातील संबंधित डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कारवाई करत कुटुंबाला व लहान मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी संजय गडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ (प्रतिनिधी)
गडकर यांच्या लहान मुलीची मी तपासणी केली आहे़ तिच्या डोक्यातील जखम गंभीर नसून, घाबरण्याचे कारण नाही़ शिवाय आमच्या रूग्णालयातील काचेच्या भांड्यात तीला ठेवण्यात आले होते़ त्यामुळे इंजेक्शनची सुई वापरण्याचा संबंध नाही़ जिल्हा रूग्णालयात हा प्रकार घडला नसून, शिवाय असा प्रकार कोणी जाणून-बुजून करणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी सांगितले़
अहवाल आल्यानंतर कारवाई
४लहान मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याची माहिती मला समजली आहे़ पालकाने निवेदन दिले असेल तर त्याची पाहणी करून याबाबतचा अहवाल मागवून घेणार आहे़ अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नारनवरे यांनी दिली़
कारवाई करा
४लहान मुलीच्या डोक्यात सुई निघाल्या प्रकरणात दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ निवेदनावर तालुकाध्यक्ष पाशुमियाँ शेख, जिल्हा सचिव संजय यादव, अभिजित पतंगे, गणेश जगताप, प्रमोद वाघमारे, बाळासाहेब सुभेदार, संजय गडकर आदीची स्वाक्षरी आहे़