विजय मल्ल्यानंतर नीरव मोदी पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:38 AM2018-02-17T00:38:56+5:302018-02-17T00:39:02+5:30
लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बँकांवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांना सरकारच वठणीवर आणू शकते. कृषी, उद्योगांना मोठे करण्यासाठी बँकांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री देसाई म्हणाले, बँकांना वाटते सामान्य लोक बुडवून पळून जातील हा त्यांचा गैरसमज आहे. हे बुडवणारे लोक नाहीत. बुडवणारे लोक पळून जातात. एकतर अगोदर पळाला, मल्ल्या आणि काल नीरव पळाला. लघु उद्योजक पळणारे नसून ते या मातीशी जुळलेले आहेत. बँकांनी नकारार्थी मानसिकता ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दोन वर्षांमध्ये शेंद्रा-बिडकीन येथील १० हजार एकर जागेचा विकास होईल. औरंगाबाद, जालना, माजलगाव येथील औद्योगिक क्षेत्रात एमएसएमईच्या उद्योगांसाठी २० टक्के तर एसटी-एससी उद्योगांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सोहम वायाळ यांनी डीएमआयसीमध्ये होत असलेल्या कामांची माहिती दिली.
कियानंतर आॅरिकचा अँकर प्रकल्प ह्योसंग
कोरियन कंपनी ‘ह्योसंग’ ही शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे़ आॅरिकसाठी ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल. ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी देखील राज्यात मोठी गुंतवणूक करणार आहे, असा दावा उद्योगमंत्री देसाई यांनी केला. हॉटेल ताज विवांता येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई कन्व्हेंशन कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते़ यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, नीरज माढेकर, महावीर लुणावत यांची उपस्थित होते़ महाराष्ट्रामध्ये ई-व्हेईकल उत्पादन क्षेत्रामध्ये लोम्बोर्गिनी ही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे़ याशिवाय डीएमआयसीमधील शेंद्रा येथे टेक्स्टाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंग ही कंपनी ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे़ १०० एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल.