दुर्लक्षित लेण्या आल्या प्रकाशझोतात; औरंगाबादच्या डोंगरांत झाडाझुडपांत दडलेल्या लेण्यांची श्रमदानातून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:59 PM2020-07-28T15:59:37+5:302020-07-28T16:12:16+5:30
जिल्हाधिकारी म्हणतात, लेण्यांची महसूल विभाग आणि राज्य पुरातत्व विभागामध्ये नोंद
औरंगाबाद : जटवाडा रोडवरील हर्सूल तलावापासून पश्चिमेकडील भीमटेकडीच्या शेजारील डोंगरामध्ये झाडात दडलेल्या पाच बुद्धलेण्यांची रविवारी नागरिकांनी स्वच्छता केल्याने या लेण्या दूरवरून दिसत आहेत. सातव्या शतकात कोरलेल्या दोन बुद्धलेण्या औरंगाबादेत आहेत. त्या भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहेत. रविवारी स्वच्छ करण्यात आलेली तिसरी लेणी आहे. या तिन्ही लेण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्तरेकडील औरंगाबादच्या डोंगरात पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला आहेत.
औरंगाबाद बुद्धलेणीच्या मागील बाजूस भीमटेकडीच्या शेजारील दुर्लक्षित आणि झाडी-मातीमध्ये दडलेल्या या बुद्धलेण्या भन्ते करुणानंद थेरो यांच्या आवाहनानुसार रविवारी (दि.२६) सकाळी ९ वाजेपासून शेकडो नागरिकांनी कुदळ-फावडे घेऊन एकत्र येत येथे श्रमदान करून स्वच्छ केल्या. या बुद्धलेणीत काही शून्यागार (ध्यान कुटी) असून, सुमारे ३००-४०० चौरस फूट आकाराचे भिक्खू निवास, विहार, ध्यानगृह आहे. दुसरी लेणी दोन मजली आहे. तेथे काही अर्धवट भिक्खू निवास आहेत. या लेण्यांत मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साचला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे होती, त्यात लेण्या गडप झालेल्या होत्या. त्यांची सफाई करण्यात आली. येथून पुढे दर रविवारी उपासक, नागरिकांनी याठिकाणी भेट द्यावी, श्रमदान करावे, असे आवाहन भन्ते करुणानंद थेरो व सचिन खरात यांनी केले.
भारतीय पुरातत्व विभागाचे औरंगाबादचे अधीक्षक दिलीपकुमार खामरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी मोबाईल रिसिव्ह न केल्यामुळे पुरातत्व विभागाचे मत समजले नाही; परंतु याच कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, लेण्यांविषयी पुरातत्व विभागाला माहिती आहे; त्या लेण्या संरक्षित नाहीत. तिकडे कुणीच जात नसल्यामुळे त्या दुर्लक्षित आहेत.
अपूर्ण राहिलेल्या लेण्या
रविवारी स्वच्छता केलेल्या लेण्यांच्या परिसरात पावसामुळे गाळ आणि पाणी साचलेले आहे. या लेण्या अपूर्ण असल्याने त्या पुरातत्त्व विभागाने ताब्यात घेतलेल्या नाहीत. जटवाडा रोड परिसरातील नागरिकांना तसेच इतिहासाच्या अभ्यासकांना या लेण्यांची माहिती आधीपासूनच आहे. मात्र, या अपूर्ण असलेल्या व गाळ आणि पाणी साचल्यामुळे या लेण्यांच्या परिसरात कुणी जात नसे. बेगमपुरा आणि परिसरात या लेण्या चोर लेण्या म्हणूनही ओळखल्या जातात.
जेम्स बर्जेस यांच्या ग्रंथात उल्लेख
१८८६ ते १८८९ या काळात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक जेम्स बर्जेस यांच्या ग्रंथात या लेण्यांची नोंद आहे. बर्जेस हे १८७३ ते ८६ या काळात पुरातत्व विभागाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचेही प्रमुख होते.
आम्ही ही माहिती भारतीय पुरातत्व विभागाला कळवली आहे; परंतु त्यांचे कुणीही आज इकडे आले नाही. मंगळवारी पाहणीसाठी येतील, असे त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले. लेण्यांकडे कुणीही जात नव्हते. मागील काही दिवसांपासून या परिसरात आम्ही भटकंती करीत होतो, तेव्हा या लेण्या दिसल्या. आत गाळ व माती भरलेली आहे. उत्खननानंतरच आत काय आहे, ते स्पष्ट होईल. - भन्ते करुणानंद
लेण्या महसूलच्या आणि राज्य पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डवर आहेत. तेथे नियमबाह्य काही करता येत नाही. लेण्या नव्याने सापडल्या, असे म्हणता येणार नाही. लेणीस्थळांची पाहणी करून अहवाल देण्यासाठी तहसीलदार आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
- जिल्हाधिकारी