निवडणूक कामात हलगर्जीपणा, सिल्लोड तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:00 PM2023-01-30T20:00:06+5:302023-01-30T20:00:43+5:30
मंडळ अधिकारी कचरू दादाराव तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सिल्लोड (औरंगाबाद) : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कामात सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांने हेतूपुरस्कर टाळाटाळ, हलगर्जीपणा केला. यामुळे कृषी अधिकाऱ्याच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आज दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. न्यानेश्वर बरदे असे अधिकाऱ्याचे नाव आहे.
मंडळ अधिकारी कचरू दादाराव तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी बरदे याने निवडणुकीसारख्या अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय कामात हेतूपुरस्कर टाळाटाळ केली. यावरून त्याच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार संबंधिताने संवैधानिक जवाबदारी पार पाडण्यात कुचराई केली आहे. तसेच जिल्हा अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम १३४,१६७,लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १८८ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब झिंझुरडे करत आहे.
निवडणूक कामात माझी नेमणूक करण्यात आली होती. मात्र नेमणूक रद्द करावी, अशी विनंती सिल्लोड तहसीलदारांकडे केली होती. ती त्यांनी मान्य ही केली होती. तरी माझ्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला याची कल्पना नाही.
- न्यानेश्वर बरदे तालुका कृषी अधिकारी सिल्लोड.
नेमणूक रद्द करण्यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी कोणतेही पत्र दिले नव्हते. निवडणुकीत त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.
- विक्रम राजपूत, तहसीलदार सिल्लोड