मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार
By विकास राऊत | Published: October 3, 2023 07:09 PM2023-10-03T19:09:58+5:302023-10-03T19:10:21+5:30
निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मतदार सर्वेक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या मुख्याध्यापकांना आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न देणाऱ्या सहशिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पूर्व मतदारसंघ सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार पल्लवी लिगदे यांनी सिटी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस गणेशोत्सवानिमित्त व्यस्त होते. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक, कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय काम सांभाळून उर्वरित वेळेत घरोघरी जाऊन ज्या मतदारांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांची भेट घेणे. तसेच मयत, स्थलांतरित, नवमतदार यांची माहिती भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु काही शाळा व इतर कार्यालयांनी वारंवार नोटिसा देऊन देखील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही, अशा शिक्षक व मुख्याध्यापकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, असे लिगदे यांनी सांगितले.
या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार: मुख्याध्यापक मिसाळ, देशमुख, सहशिक्षक श्वेता साबळे, एस. ए. शेख, एस. डी. जाधव, शमीम बेगम, आनंद सातदिवे, स्वामी जाधव, विजय आगाव, के. डी. बावस्कर, कैलास टेकाळे यांना दिलेले सर्वेक्षणाचे काम अपूर्ण राहिले आहे. हे कर्मचारी गारखेडा, मिसारवाडी, नारेगावमधील विविध शाळांतील आहेत. कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक विभागाला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना नोटिसा बजावल्या. हे कर्मचारी निवडणूक कामकाजास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून एफआयआर देण्यात यावा, असे तहसीलदार लिगदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी अजून काही कार्यवाही केलेली नाही.