"नॅक" मूल्यांकनाकडे फिरवली पाठ; ४७१ पैकी १६१ महाविद्यालये बंद होणार?

By राम शिनगारे | Published: July 7, 2023 06:17 PM2023-07-07T18:17:20+5:302023-07-07T18:18:06+5:30

विद्यापीठ प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

negligence to "NAAC" valuations; 161 out of 471 colleges will be closed? | "नॅक" मूल्यांकनाकडे फिरवली पाठ; ४७१ पैकी १६१ महाविद्यालये बंद होणार?

"नॅक" मूल्यांकनाकडे फिरवली पाठ; ४७१ पैकी १६१ महाविद्यालये बंद होणार?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ४७१ महाविद्यालयांपैकी १६१ महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात येणार आहे. राज्य शासनाने अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना ''नॅक'' मूल्यांकन करणे बंधनकारक केले होते. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत ''नॅक''कडे किमान नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तोपर्यंत नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता न थांबविण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार १६१ महाविद्यालयांनी ''नॅक''ची कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांवर केव्हा हातोडा चालविण्यात येणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या उच्चशिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मागील महिन्यात एक पत्र काढून संलग्न महाविद्यालयांतील ''नॅक''ची प्रक्रिया सुरू न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्याची कारवाई करण्याविषयी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र पाठवले. तसेच महाविद्यालयांवर केलेल्या कारवाईचा अहवालही उच्च शिक्षण विभागाला सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने ''नॅक'' मूल्यांकन केलेले, मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केलेल्या आणि न केलेल्या महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. त्यात कोणतीही प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या १६१ आहे.

काय होती ''नॅक''ची अट ?
उच्चशिक्षण विभागाने ''नॅक'' मूल्यांकनासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. ३१ मार्च २०२३ पर्यंत नॅक मूल्यांकनासाठी किमान नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अनेक महाविद्यालयांनी नॅकची नोंदणीही केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने २०२३-२४ या वर्षातील प्रवेश सुरू होईपर्यंत ज्या महाविद्यालयांनी नोंदणी केलेली नसेल, त्यांच्यावर संलग्नता रद्द करण्याची कारवाई करण्याचे पत्र २३ मे रोजी विद्यापीठांना पाठवले. विद्यापीठ प्रशासनाने १९ जून रोजी महाविद्यालयांवर कारवाई करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

महाविद्यालयांची ''नॅक'' संदर्भातील सद्यस्थिती
''नॅक''चे विविध टप्पे...........................महाविद्यालयांची संख्या

''नॅक'' मूल्यांकन झालेले.......................७१
मूल्यांकन प्रक्रिया सुरू.....................१५९
नॅकमधून सूट मिळालेले........................८०
कोणतीही प्रक्रिया न करणारे..............१६१
एकूण महाविद्यालये.............................४७१

शासनाच्या आदेशानुसार कारवाई 
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. त्यासाठी प्राचार्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. काही महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले, काहींनी केलेले नाही. ३० जूनपर्यंतची वस्तुस्थिती शासनाला कळविलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयांवर पुढील कारवाई करण्यात येईल.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

Web Title: negligence to "NAAC" valuations; 161 out of 471 colleges will be closed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.