कोसळण्याच्या बेतातील दोन जलकुंभांकडे दुर्लक्ष
By Admin | Published: June 10, 2014 12:34 AM2014-06-10T00:34:32+5:302014-06-10T00:58:14+5:30
वाळूज महानगर : जोगेश्वरी व वाळूज येथील जलकुंभ कोसळण्याच्या बेतात असून, त्याला पाडण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली
वाळूज महानगर : जोगेश्वरी व वाळूज येथील जलकुंभ कोसळण्याच्या बेतात असून, त्याला पाडण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे, तर एमआयडीसीच्या जलकुंभाची दुरवस्था झाली आहे.
वाळूज ग्रामपंचायतीला हा जलकुंभ पाडण्यासाठी परवानगी मिळाली असून, जोगेश्वरी ग्रामपंचायत धोकादायक जलकुंभ पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा परिषद व गंगापूर पंचायत समितीकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे जलकुंभ पाडण्यास परवानगी मिळत नाही, हे नागरिकांना कळत नाही. हे जलकुंभ नागरी वसाहतीलगतच असल्यामुळे तेथे कायम वर्दळ असते.
या जलकुंभांचे स्लॅब मोडकळीस आले असून, त्याला ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. जलकुंभांच्या जिन्याची व पायऱ्यांची दुरवस्था झाली असून, लहान मुले जलकुंभाशेजारीच खेळत असतात. अनेक नागरिक, वाहनधारक जलकुंभाशेजारून ये-जा करतात. आता पावसाळ्यात जलकुंभात पाणी मुरून तो कोसळण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.
परवानगी मिळेना
जोगेश्वरीतील धोकादायक जलकुंभ पाडण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग व पंचायत समितीकडे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, जलकुंभ पाडण्यास परवानगी मिळालेली नाही.
-योगेश दळवी,
सरपंच, जोगेश्वरी
लवकरच पाडणार
मोडकळीस आलेल्या जलकुंभाजवळ सूचना फलक लावून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जलकुंभापासून लहान मुले व नागरिकांना तेथून दूर जायला कर्मचारी सांगतात. हा जलकुंभ पाडण्यासाठी मंजुरी मिळाली असून लवकरच तो पाडला जाईल.
-रंजना भोंड, सरपंच, वाळूज