२०२१ पैकी सुमारे २२५ मतदान केंद्रांवर बोटावर मोजण्याइतके झाले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:50 IST2019-05-30T18:47:14+5:302019-05-30T18:50:05+5:30
शिवसेनेला १६, एमआयएमला १०, तर अपक्षाला ११ केंद्रांवर शून्य मतदान

२०२१ पैकी सुमारे २२५ मतदान केंद्रांवर बोटावर मोजण्याइतके झाले मतदान
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा क्षेत्र मिळून असलेल्या २०२१ मतदान केंद्रांपैकी सुमारे २२५ केंद्रांवर सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बोटावर मोजण्याइतके मतदान झाले आहे. शिवसेनेला १६ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. एमआयएमला १० केंद्रांवर, तर अपक्ष उमेदवाराला ११ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. काँग्रेसला अनेक केंद्रांवर ५० च्या आत-बाहेर मतदान झाले आहे.
मुस्लिम आणि दलित भागातून शिवसेनेला १, २, ७, ५ अशी मते मिळाली आहेत. २०२१ पैकी अंदाजे २ हजार बुथवर शिवसेनेला मतदान झाले आहे. एमआयएमला देखील १० ते १५ मतदान केंद्रे सोडली तर जवळपास सर्व केंद्रांवर खाते उघडता आले. अपक्ष उमेदवारालादेखील १० केंद्रे वगळता सर्वत्र कमी-अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला सर्व केंद्रांवर मतदान मिळाले आहे. एक-दोन वगळता कोणत्याही केंद्रावर काँग्रेसला शून्य मते मिळालेली नाहीत.
गंगापूर मतदारसंघातून १० केंद्रांवर शिवसेनेला बोटावर मोजण्याइतके मतदान झाले. पश्चिम मतदारसंघात ६ ते ७ केंद्रांवर, तर मध्य मतदारसंघात ५ केंद्रांवर शून्य मतदान मिळाले आहे. २१ केंद्रांवर १ ते ७ मतांदरम्यान मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. पूर्व मतदारसंघातील ३५ केंद्रांवर सर्व मिळून १०५ मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. तशी परिस्थिती अपक्ष उमेदवाराची आहे. हिंदूबहुल भागांमध्ये एमआयएमच्या उमेदवाराला मतदान झाले आहे. वैजापूरमध्ये एमआयएमला १२ केंद्रांवर कमी मतदान झाले आहे. कन्नड मतदारसंघात एमआयएमला १८ बुथवर कमी मतदान आहे.
शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार
२० वर्षांपासून शिवसेनेकडे मतदारसंघ असल्यामुळे सर्व मतदान केंद्रांवरून कमी-अधिक मतदान होणे स्वाभाविक आहे; परंतु एमआयएम आणि अपक्ष उमेदवाराला प्रचाराला आणि स्वत:ला मतदारांसमोर जाण्यास कमी वेळ मिळाला तरी त्यांना जवळपास सर्व केंद्रांवर मतदान झाले. अपक्ष उमेदवाराला अपक्षेपेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार पडल्याचे मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून दिसते.