आंतरराष्ट्रीय उद्योगांसोबत बोलणी सुरू; ऑरिकमध्ये लवकरच अँकर प्रकल्प - सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 12:25 PM2021-10-09T12:25:57+5:302021-10-09T12:59:58+5:30
मराठवाड्याबाबत सवलतींचे आकर्षण दिले तरी गुंतवणूकदार ऐकून घेतात, पण निर्णय घेताना त्यांचे वेगळेच निकष असतात.
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत उभारलेल्या ऑरिक सिटीमध्ये अँकर प्रकल्प आल्याशिवाय औद्योगिक विकास होणार नाही. त्यासाठी दोन ते तीन आंतरराष्ट्रीय मोठ्या उद्योगांसोबत बोलणी सुरू आहेत. त्यातील एक तरी उद्योग येईल अशी खात्री आहे. एनएलएमके या रशियन कंपनीला ऑरिक किंवा बिडकीनमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
‘लोकमत’ कार्यालयाला उद्योगमंत्री देसाई यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे एडिअर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत करून स्वलिखित ‘माझी भिंत’, ‘व्हायब्रण्ट विग्नेट्स’ ही पुस्तके त्यांना भेट दिली. या भेटीत उभयंतांमध्ये मराठवाड्यातील उद्योग, व्यवसाय, शहर पाणीप्रश्न, पर्यटन, रस्ते, अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व भरपाईसह इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आ. अंबादास दानवे यांच्यासह लोकमतच्या सर्व वरिष्ठ संपादक सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
उत्पादनक्षम उद्योगामुळे रोजगार वाढतात, त्यामुळे ऑरिकमध्ये अँकर प्रकल्पासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, या प्रश्नावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, ऑरिकमध्ये अँकर प्रोजेक्ट आलाच पाहिजे. तसा उद्योग आल्यानंतरच येथील उद्योगांची इकोसिस्टीम वाढीस लागेल. मोठा उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्याबाबत सवलतींचे आकर्षण दिले तरी गुंतवणूकदार ऐकून घेतात, पण निर्णय घेताना त्यांचे वेगळेच निकष असतात. इतर राज्यांशी महाराष्ट्राची स्पर्धा आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डिफेन्स क्लस्टर केंद्र शासनाच्या धोरणात आहे. या उद्योगांना ऑटो क्लस्टरसारखी कॉमन फॅसिलिटी देऊन ते क्लस्टर उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी एमआयडीसीमार्फत गुंतवणूक करण्याचीही शासनाची तयारी आहे.
- एनएलएमके ही रशियन कंपनी स्पेशल इंडस्ट्रियल गुड्ससाठी लागणारा पत्रा तयार करते. ट्रान्सफार्मरचे पोलादही ते बनवितात. तो उद्योग आल्यावर ट्रान्सफार्मर बनविणारे देशातील अनेक उद्योग येथे येतील.
- ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचा प्रकल्प ऑरिकमध्ये यावा यासाठी प्रयत्नशील आहोत. कंपनी भारतीय बाजारपेठेचा अंदाज घेत आहे. त्यांना लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होत नाही, तोवर वाट पहावी लागेल. टेस्ला हातून गेले नाही. बंगळुरुमध्ये त्यांचे फक्त संशोधन केंद्र सुरू झाले आहे.
हेही वाचा - आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र