ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:09 PM2023-06-23T14:09:46+5:302023-06-23T14:10:15+5:30

व्यापाऱ्यांचा गोरख धंदा; बियाणे विक्रेत्यांकडून त्यांच्या मर्जीतील कंपनीचे बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले.

Neither Kabaddi... nor Panga...; Arbitrariness of seed sellers; The looting of farmers | ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट

ना कब्बडी... ना पंगा...; बियाणे विक्रेत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट

googlenewsNext

- बापू सोळुंके/ संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर :
पावसाअभावी खरिपाची पेरणी लांबली असली, तरी कृषी सेवा केंद्रांनी कपाशीच्या संकेत, कब्बडी, पंगा आणि ७०६७ या बीटी कॉटन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले. बियाणे विक्रेत्यांकडून त्यांच्या मर्जीतील कंपनीचे बियाणेच शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसले.

नवा मोंढा जाधववाडी येथील एका दुकानदाराकडे संबंधित प्रतिनिधीने शेतकरी असल्याचे सांगून कब्बडी आणि संकेत, पंगा आणि युएस ६७७० या बियाण्यांची मागणी केली असता, दुकानदाराने या वाणांऐवजी दुसरीच बियाणी माथी मारण्याचा प्रयत्न केला. अन्य एका दुकानदाराने राशीच्या एका बॅगसोबत दुसरी आणखी बॅग खरेदी करण्याची सक्ती केली. शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे विक्री करू नका, बियाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने कृषी विभागाला दिलेले असताना कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात परवानाधारक बियाणे विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची राजरोस लूट सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. तर एका कृषी सेवा केंद्र चालकाने प्रामाणिकपणे त्याच्याकडे तुलशी सीड कंपनीच्या ‘पंगा’ नावाचे बीटी बियाण्याच्या दोन बॅग नियमानुसार विक्री करण्याची तयारी दर्शविली.

स्टिंग ऑपरेशनमध्ये काय आढळले...
१) स्थळ - --- फर्टिलायझर, नवा मोंढा जाधववाडी

प्रतिनिधी - शेठ नमस्कार...
दुकानदार - नमस्कार...
प्रतिनिधी - पंगा आहे का?
दुकानदार - पंगा, कब्बडी, ७०६७ आणि संकेत हे तिन्ही वाण नाहीत.
प्रतिनिधी - का बरं, शॉर्टेज आहे का? कंपनीकडून माल आला नाही?
दुकानदार - आम्ही बुकिंगच केली नाही.
प्रतिनिधी - सगळे याच बियाण्यांच्या मागे लागलेत.
दुकानदार - ते भेटत नाही, शेतकऱ्यांना.
प्रतिनिधी - ठीक आहे. आम्हाला संकेत अथवा कब्बडी बियाणेच पाहिजे होते.
----------------------------------------------------

२) स्थळ - ---- कृषी सेवा केंद्र, नवा मोंढा जाधववाडी
प्रतिनिधी - नमस्कार...
दुकानदार - काय पाहिजे?
प्रतिनिधी - सरकीचे बियाणे पाहिजे.
दुकानदार - राशी आरसीएच भेटेल.
प्रतिनिधी - संकेत अथवा कब्बडी आहे का?
दुकानदार - नाही.
प्रतिनिधी -एवढा का तुटवडा आहे?
दुकानदार - मालच भेटत नाही.
प्रतिनिधी - कोठे भेटेल?
दुकानदार - येथे कोणाकडेच नाही. तुम्ही राशी बियाणे घेऊन जा. खूप चांगले आहे. ॲव्हरेज एकरी १६ क्विंटलचा आहे.
प्रतिनिधी - काय किंमत आहे?
दुकानदार - ८५० रुपये. पण एक पाकीट मिळणार नाही.
प्रतिनिधी - का बरं?
दुकानदार - आम्हाला कंपनीनेच तसे सांगितले आहे.
प्रतिनिधी - कसे काय?
दुकानदार - हे पाकीट घ्यायचे असेल तर दुसरे पाकीट घ्यावे लागेल.
प्रतिनिधी - नको, आम्हाला कब्बडीचेच बियाणे पाहिजे.
--------------------------------------------

३) स्थळ - --- कृषी सेवा केंद्र, चौका, ता. फुलंब्री.
प्रतिनिधी - संकेत आहे का?
दुकानदार - नाही.
प्रतिनिधी - मग कोणते आहे?
दुकानदार - अजित आहे, राशी आहे, धनदेव, जंगी आहे.
प्रतिनिधी - कब्बडी आहे?
दुकानदार - आमच्याकडे कब्बडी, संकेत बियाणे नाही.
प्रतिनिधी - फलकावर तर साठा लिहिलेला आहे ना?
दुकानदार - नाही... साठा नाही, ते मागचे लिहिलेले आहे.
---------------------------------------------

४) स्थळ - --- कृषी उद्योग, सावंगी.
प्रतिनिधी - संकेत मिळेल का?
दुकानदार - नाही.
प्रतिनिधी - सरकी बियाणे कब्बडी आहे का?
दुकानदार - या व्हरायट्या मार्केटमध्ये भेटत नाही.
प्रतिनिधी - दुसऱ्या कोणत्या आहेत ?
दुकानदार - महिकोचे आहे, बायेासिड, एसिएंट ॲग्रोचे, टाटाचे आहे. पंगा आहे.
प्रतिनिधी - पंगा आहे का?
दुकानदार - हो, दोनच बॅगा आहेत.
प्रतिनिधी - केवढ्याला आहे?
दुकानदार - ८५० रुपयांना आहे.
प्रतिनिधी - कोरडवाहू चालते का बागायती ?
दुकानदार - कोरडवाहू आणि बागायतीसाठी चालते.
-------------------------------------

५) स्थळ - ---कृषी सेवा केंद्र, चौका.
प्रतिनिधी - कब्बडी नाहीतर संकेत बियाणे पाहिजे होते.
दुकानाबाहेर दोन उभे शेतकरी - आम्ही पण कब्बडी घेण्यासाठीच आलो आहोत.
प्रतिनिधी - मिळाले का?
शेतकरी - नाही हो...
प्रतिनिधी - आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्येही मिळाले नाही.
शेतकरी - सिल्लोडशिवाय कुठेही मिळणार नाही.
प्रतिनिधी - खरं का?
शेतकरी - तीन हजार रुपयांत बॅग मिळते, आमच्या नातेवाईकांनी आणली.
प्रतिनिधी - सिल्लोडला कोणाकडे मिळेल सांगा?
शेतकरी - आम्हाला नाही सांगता येणार.
प्रतिनिधी - ठीक आहे.

Web Title: Neither Kabaddi... nor Panga...; Arbitrariness of seed sellers; The looting of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.