'ना मला ना तुला, घाल....',आपसातील कुरघोड्यांवर राजेश टोपेंनी टोचले स्थानिक नेत्यांचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 07:01 PM2021-09-11T19:01:44+5:302021-09-11T19:07:56+5:30
Rajesh Tope : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली.
पैठण (औरंगाबाद ) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्ते व नेत्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP ) औरंगाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी पैठण येथे केले. पैठणशहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठकीत ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथील माहेश्वरी भक्त निवासात झालेल्या बैठकीत पक्षाचा आढावा घेतला. यावेळी टोपे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी नेत्यांनी मी पणा सोडून पार्टीचे काम निष्ठेने केले तर पार्टी मजबूत होईल आपापसात भांडत राहीले तर "ना मला ना तुला, घाल...." अशी अवस्था होईल. त्यासाठी मतभेद बाजुला सारुन प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कान टोचले.
विधानसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या एका नेत्याचे नाव यावेळी बैठकीत कानोकानी झाले. पैठण शहरात लवकरच उपजिल्हा रुग्णालय सुरु करणार असल्याचे यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. यानंतर ग्रामीण रूग्णालयास भेट देऊन तेथील कामकाजाचा मंत्री टोपे यांनी आढावा घेतला. पक्षाने आतापर्यंत माझ्यावर विश्वास टाकला आहे. गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा, बुथ निहाय समिती तयार करण्याचे काम सुरु आहे. पक्ष वाढीसाठी कुठेही कमी पडणार नाही. असे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी बैठकीत बोलताना सांगितले. दत्ता गोर्डे लढवय्या कार्यकर्ता आहे असा प्रतिसाद मंत्री टोपे यांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया जंगले, माजी आमदार चंद्रकांत घोडके, माजी आमदार संजय वाघचौरे, महिला शहराध्यक्ष निता परदेशी, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक भाऊसाहेब पिसे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा.पी आर थोटे, महीला आघाडी तालुका अध्यक्ष शांता नरवडे, अफरोज वड्डे, बजरंग लिबोरे, विशाल वाघचौरे, ज्ञानेश घोडके, यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - संतपीठात तीन विभागांचे पाच अभ्यासक्रम; एक ऑक्टोबरपासून होणार सुरुवात