ना दहावा-तेरावा, ना पिंडदान; कोरोनामुळे इथे माणुसकी आणि नात्यांची झाली राख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:52 PM2020-05-18T12:52:49+5:302020-05-18T12:56:27+5:30

कोरोनाने कुुटुंबापासून तोडून अवेळी या जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले आणि मृत्यूनंतर नातेवाईकांनीही भीतीपोटी स्मशानातच ठेवले, असाच प्रकार सध्या घडतो आहे.

Neither tenth-thirteenth, nor pindadan; Because of Corona, humanity and relationships have been destroyed here | ना दहावा-तेरावा, ना पिंडदान; कोरोनामुळे इथे माणुसकी आणि नात्यांची झाली राख...

ना दहावा-तेरावा, ना पिंडदान; कोरोनामुळे इथे माणुसकी आणि नात्यांची झाली राख...

googlenewsNext
ठळक मुद्देमृतदेहाच्या अस्थी स्मशानातच पडूनसुरक्षासाधने स्मशानभूमीतच पडून 

- विकास राऊत 

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर  शहरातील विविध भागांतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर काही मृतांची राख सावडली नाही, अस्थी विसर्जनही केले नाही. शिवाय दहावा, तेरावा आणि पिंडदानही झाले नाही. स्मशानजोगींना मृतदेहांच्या अस्थी, राख जतन करावी लागते आहे. कोरोनामुळे माणुसकी आणि नात्यांची राख झाल्याचे वैषम्यपूर्ण चित्र दिसू लागले आहे.  

कोरोनाने कुुटुंबापासून तोडून अवेळी या जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले आणि मृत्यूनंतर नातेवाईकांनीही भीतीपोटी स्मशानातच ठेवले, असाच प्रकार सध्या घडतो आहे.  कोरोनामुळे  ज्यांचा बळी गेला त्यांच्यापैकी काही पार्थिवांवर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतरच्या विधीविना त्या पार्थिवांच्या अस्थी व राख स्मशानातच पडून आहे. स्मशानजोगींनी नातेवाईकांना फोन करून राख विसर्जित करण्यासाठी घेऊन जा, हे सांगण्यासाठी संपर्क केला असता अनेकांनी राख नेण्यास नकार दिला. एक-दोन नातेवाईक आले, त्यांनी ती राख स्मशानभूमीतच एका बाजूला फेकून दिली. काही मृतदेहांची राख आम्हालाच विसर्जित करा म्हणून सांगण्यात आले, तर काहींनी तुम्ही आणि महापालिका याबाबत काय निर्णय घ्यायचा ते ठरवा, असे सांगून हात झटकले. शेवटी  माणुसकी म्हणून आम्हीच मृतदेहाच्या अस्थी, राख भरून ठेवली आहे. त्यावर मृताचे नाव टाकले आहे, अशी माहिती  शहरातील एका स्मशानभूमीतील स्मशानजोगीने दिली. 

स्मशानातही माणसेच राहतात 
पुंडलिकनगर, संजयनगर येथील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर बेगमपुरा व इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुकुंदवाडी स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत रुग्णवाहिनीतून मृतदेह आणला जातो. अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचारी सुरक्षासाधने स्मशानभूमीतच फेकून देतात. स्मशानात माणसे राहतात, याचा ते विचारही करीत नाहीत. स्मशानजोगींना दिलेली सुरक्षासाधने कमी आहेत. कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. जास्तीच्या पीपीई कीट प्रत्येक स्मशानजोगीकडे  देण्यात याव्यात. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह केव्हा आणणार, याबाबत काहीही माहिती नसते, अचानक रुग्णवाहिनी येते आणि धावपळ सुरू होते, असे एका स्मशानजोगीने सांगितले.

Web Title: Neither tenth-thirteenth, nor pindadan; Because of Corona, humanity and relationships have been destroyed here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.