दीड कोटीसाठी मित्राच्या मदतीने भाच्याचे अपहरण; मुंबईच्या फौजदारासह तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 06:01 PM2019-06-13T18:01:26+5:302019-06-13T18:06:31+5:30
पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली.
औरंगाबाद: कौटुंबिक वादातून मित्राच्या मदतीने मेहुण्याला बेदम मारहाण करून सहा वर्षीय भाच्याचे दिड कोटी रुपयांसाठी अपहरण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी विद्यानगर येथे घडली. याप्रकरणी वकिल पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणकर्त्यांविरोधात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी मुबईत कार्यरत असलेल्या फौजदारासह तीन जणांना अटक केली.
फौजदार अमोल चव्हाण(नेमणूक चेम्बुर ठाणे, मुंबई), मुलाचा मामा कृष्णा बापुराव लाटकर (रा. घाटकोपर) आणि शांभवी अनिल मालवणकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील अॅड.श्रीकांत तात्यासाहेब वीर (वय ४०)यांचे त्यांची पत्नी अॅड. सोनाली यांच्यासोबत पटत नाही. यामुळे वर्षभरापासून वीर पती-पत्नी विभक्त राहते. या दाम्पत्याला मुलगी आर्या (वय १०) आणि मुलगा रमन (वय ६) असे अपत्ये आहे.आर्या आईसोबत मुंबईत तर रमन हा वडिलासोबत औरंगाबादेत राहतो. त्यांच्यात मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशाने अॅड. श्रीकांत वीर यांनी रमन यास १८ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या केसची तारीख २९ जून रोजी ठेवली आहे. १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अॅड. श्रीकांत हे त्याच्या विद्यानगर येथील घरी असताना फौजदार अमोल चव्हाण, कृष्णा लाटकर, शांभवी मालवणकरसह सात जण काठ्या आणि चाकू घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी रमनला बळजबरीने त्यांच्या घरातून हिसकावून नेले.
दिड कोटीची खंडणी मागितली
रमनला घेऊन जाताना आरोपींनी वीर परिवाराकडे दिड कोटी रुपयांची खंडणी मागितली. मुलगा हवा असेल तर दिड कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा मुलाचा जीव कसा घ्यायाचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,अशी धमकीच आरोपींनी दिल्याचे वीर यांनी तक्रारीत नमूद केले.
वीर यांच्या वृद्ध आई-वडिलांना केली मारहाण
यावेळी श्रीकांत आणि त्यांच्या वृद्ध आर्ई-वडिलांनी आरोपींना अडविण्याचा आणि रमनला सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तेथे दहशत निर्माण करीत त्यांना बेदम मारहाण केली. यामुळे कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. विशेष म्हणजे ही मारहाण रस्त्यावर सुरू होती. ही घटना समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फौजदार चव्हाण, मालवणकर आणि श्यामभवीला पकडले. दरम्यान याप्रकरणी श्रीकांत वीर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण करणे, खंडणी मागणे, दंगा करणे, मारहाण करणे,आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यामार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहे.