औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाने दिली हजारो रुग्णांना नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:50 PM2018-09-20T21:50:17+5:302018-09-21T11:43:55+5:30
शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अर्ध्या महाराष्ट्रातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड आणि नवसंजीवनी देणारे ठरत असून, ६ वर्षांच्या कालावधीत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवे जीवन मिळाले आहे.
घाटी रुग्णालयातील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार होत असताना रुग्णांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथवर थांबलेले दिसत. कॅन्सर रुग्णांसाठी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. त्यामुळे मुंबईला जाण्याची नामुष्की गोरगरिबांवर ओढावत होती. कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबादेत उभारावे, यासाठी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदानासमोरील जागाही मिळवून दिली. २००८ मध्ये रुग्णालयाला मंजुरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले.
औरंगाबादेत कर्क रोग रुग्णालय सुरू झाले आणि आता अर्ध्या राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. रुग्णालयात मराठवाड्यासह धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव,नाशिकसह १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन रुग्णसेवेत भर पडत आहे.
रुग्णसंख्या २२ हजारांवरून ४७ हजारांवर
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २०१३ मध्ये २२ हजार १२० रुग्णांवर उपचार क रण्यात आले. ही संख्या दरवर्षी वाढून २०१७ मध्ये ४७ हजार २२४ इतक्यावर पोहोचली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक आहे, तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
रुग्णालयाची प्रगती
सहा वर्षांत रुग्णालयाची मोठी प्रगती झाली आहे. विस्तार होऊन राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा सुरूआहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार होत आहेत.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्ण
रुग्णालयात उपचारासाठी अर्ध्या महाराष्ट्रातून म्हणजे १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण येतात. राज्य कर्करोग रुग्णालयाच्या दर्जामुळे आगामी कालावधीत अद्ययावत यंत्रे दाखल होतील. त्यामुळे आणखी चांगली रुग्णसेवा देता येईल.
- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय
आकडेवारीत राज्य कर्करोग संस्थेचा आढावा : (२१ सप्टेंबर २०१२ ते ३० आॅगस्ट २०१८)
बाह्यरुग्ण विभाग - २ लाख १२ हजार १६६
आंतररुग्ण विभाग- २४ हजार ४४१
लिनिअर एस्केलेटर - ४ हजार ८७
कोबाल्ट युनिट - १ हजार ४२२
ब्रेकी थेरपी - १ हजार ५३२
डे केअर केमोथेरपी - ३८ हजार ४८४
मोठ्या शस्त्रक्रिया - ४ हजार २३२
छोट्या शस्त्रक्रिया - ३ हजार ६५