नवे २५ फौजदार, २५० जवान रुजू
By Admin | Published: June 16, 2016 12:02 AM2016-06-16T00:02:10+5:302016-06-16T00:16:06+5:30
औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत.
औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आलेले २५ परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. नव्याने दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आयुक्तालयाचे मनुष्यबळ ३ हजार ५१७ झाले आहे.
देशातील प्रमुख पर्यटन केंद्रापैकी एक असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. विविध औद्योगिक वसाहतींसोबतच दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची यात भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक आणि ५५ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विशेष शाखा कार्यरत आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रंदिवस चार्ली पोलीस दुचाकीवर शहराच्या वेगवेगळ्या भागांत गस्तीवर असतात. त्यासोबतच पोलीस कं ट्रोल रूम मोबाईल या वातानुकू लित वाहनामधून गस्त सुरू करण्यात आली. या गस्तीमुळे शहरातील रस्त्यावरील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे दरवर्षी भरतीचे आयोजन करण्यात येते. २०१४ साली भरती झालेले २५० पोलीस शिपाई नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून रुजू झाले.
पोलीस आयुक्तालयात २५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रुजू झाले आहेत.
नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना राज्यातील विविध विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत.
१२ फौजदारांची पदावनती
पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १२ फौजदारांना १४ जून रोजी तडकाफडकी पदावनत करून सहायक फौजदार या मूळ पदावर त्यांना पदस्थापना देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या पदावनतीने फौजदारांमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत मंजूर एकूण पदांपैकी निम्मी पदे ही सरळसेवा भरती प्र्रक्रियेंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतात. तर उर्वरित खात्यांतर्गत बढती देऊन भरली जातात. रिक्त असलेल्या एकूण ४२ पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार सहायक पोलीस उपनिरीक्षकांना तात्पुरत्या बढत्या देण्यात आल्या होत्या.
२५ ताज्या दमाचे फौजदार आयुक्तालयात रुजू झाले. या फौजदारांना विविध ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत. त्यांना नेमणुका देण्यासाठी पदे रिक्त करणे आवश्यक होते. म्हणून या पदावनती झाल्या.