बंगळुरू, हैदराबादसाठी नवी विमानसेवा; औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीचे ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:49 PM2020-01-14T12:49:48+5:302020-01-14T12:52:29+5:30
पहिल्याच दिवशी मिळाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद
औरंगाबाद : शहराच्या देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. स्पाईस जेटची सोमवारपासून बंगळुरू आणि हैदराबादसाठी नवीन विमानसेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी या दोन्ही विमानांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.
स्पाईस जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद विमानाने सोमवारी ६७ प्रवासी शहरात आले आणि औरंगाबादहून ४७ प्रवासी हैदराबादला रवाना झाले. याबरोबरच बंगळुरू साठी सुरू केलेल्या नव्या विमानाने पहिल्या दिवशी ६७ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले, तर २७ प्रवाशांनी औरंगाबादहून बंगळुरूचा प्रवास केला. पहिल्याच दिवशी दोन्ही विमानांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या दोन्ही विमानांचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले.
११ विमानांची ये-जा
औरंगाबादहून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या ११ वर गेली आहे. म्हणजे ११ विमानांची दररोज ये-जा होत आहे. स्पाईस जेटकडून दिल्लीसाठी २ विमानसेवा, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होती. त्यात सोमवारपासून बंगळुरू आणि हैदराबादसाठी नव्या विमानसेवेची भर पडली. ट्रूजेटकडून ७२ आसनी विमानाद्वारे हैदराबाद आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू आहे. त्यामुळे शहरातून सध्या दररोज बंगळुरूसाठी २ आणि हैदराबादसाठी ३ विमाने उपलब्ध झाली आहेत.
विमानसेवा आणखी वाढणार
औरंगाबादहून ५ फेब्रुवारीपासून मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठीही इंडिगोकडून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, तसेच २० फेब्रुवारीपासून बंगळुरूसाठीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीनंतर बंगळुरूसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या ३ वर जाईल.