देवगिरी कॉलनीत नवीन जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:02 AM2021-04-02T04:02:56+5:302021-04-02T04:02:56+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील देवगिरीनगरात ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या वसाहतीतील नागरिकांना कायम ...
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील देवगिरीनगरात ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या वसाहतीतील नागरिकांना कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची ओरड त्रस्त नागरिकांनी केली. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
---------------
विप्रो कंपनीत नवीन युनिट कार्यकारिणी
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील विप्रो इंटरप्रायजेस या कंपनीत नवीन स्थानिक युनिट कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कंपनीत महाराष्ट्र कामगार विकास संघटनेची युनियन असून, नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष- विजय जाधव, उपाध्यक्ष-गणेश खोसेल, सचिव - भरत नायकोडी, गणेश नलावडे, कोषाध्यक्ष- सतीश पाटील, रशीद पठाण, संघटक- प्रकाश सूर्यवंशी, आदी.
----------------------------------
महाराणा प्रताप चौकात धोकादायक खड्डे
वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रातप चौकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या चौकातील रस्ता उखडला असून, ठिकठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत वाहने आदळत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. एमआयडीसी प्रशासनाने या चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी व्यावसायिक व वाहनधारकांतून केली जात आहे.
------------------------
पंढरपुरातील फुटपाथ गायब
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करीत नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे.
---------------------------------
जोगेश्वरीत अवेळी पाणीपुरवठा
वाळूज महानगर : जोगेश्वरीत पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, अवेळी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही दखल घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
-----------------------------