बच्चे कंपनीसाठी नवे आकर्षण, सिद्धार्थ उद्यानात लवकरच ‘वॉटर बोट’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:35 PM2022-04-22T19:35:24+5:302022-04-22T19:38:09+5:30
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यानात तुळजाई एंटरप्रायजेसमार्फत उभारण्यात येणारा वॉटर बोट हा प्रकल्प १५ मेपर्यंत कार्यान्वित होईल
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात लहान मुले मोठ्या संख्येने येतात. मुलांच्या करमणुकीसाठी वेगवेगळे उपक्रम मनपा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहेत. उद्यानात एका ठिकाणी मुव्हेबल रबर वॉटर टँकच्या साहाय्याने वॉटर बोट व इतर खेळणी उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तुळजाई एंटरप्रायजेस संस्थेने तयारी दर्शवली असून, दहा वर्षांसाठी हा प्रकल्प राबविला जणार असल्याचा ठराव घेण्यात आला आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने तुळजाई एंटरप्रायजेस यांना ५ ते १२ वयोगटातील मुलांच्या मनोरंजनासाठी मुव्हेबल रबर वॉटर टँकमधील वॉटर बोट व इतर खेळणी उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करणे, हा परिसर कायम स्वच्छ ठेवून दहा वर्षे प्रकल्प चालविण्यासाठी १ लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पासाठी २० बाय ३० आकाराची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ५० रुपये प्रति बालक अशी फी आकारण्यात येईल. या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब दरमहा सादर करावा लागेल. दर महिन्याच्या उत्पन्नातून २५ टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून मनपाला द्यावी लागेल. दरवर्षी प्रवेश फी व रॉयल्टीमध्ये दहा टक्के भाववाढ केली जाईल, अशा अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
२५ टक्के सूट
वॉटर बोटसाठी प्रति बालकास ५० रुपये फी आकारण्यात येणार असली तरी शालेय सहल आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रुपला २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना आवाजामुळे त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.
१५ मे पासून कार्यान्वित होणार
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ उद्यानात तुळजाई एंटरप्रायजेसमार्फत उभारण्यात येणारा वॉटर बोट हा प्रकल्प १५ मेपर्यंत कार्यान्वित होईल, या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. उद्यानात येणाऱ्या बालकांना खेळण्यासाठी मनोरंजनाचे साधन उपलब्ध होणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.