नवीन औरंगाबाद शहर गणेश महासंघ ‘श्रीं’ ची उत्साहात स्थापना
By Admin | Published: September 6, 2016 12:58 AM2016-09-06T00:58:33+5:302016-09-06T01:06:36+5:30
औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली.
औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली. याप्रसंगी १२ वर्षांत महासंघाने केलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. यावेळी माजी आ.कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आ.नामदेव पवार, उद्योगपती श्रीकांत शेळके, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, मनपा गटनेते राजू वैद्य, गटनेते भाऊसाहेब जगताप, महासंघाचे अध्यक्ष पंजाबराव तौर, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, कार्याध्यक्ष नसीर पटेल, स्वागताध्यक्ष मनोज जैस्वाल, सचिव बाळासाहेब हरबक, उद्धव सावरे, बाबूराव कवसकर, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, बी. बी. शिंदे, आतिश पितळे, प्रभाकर पवार, राजाराम पवार, कल्याण कावरे, नीलेश सुरासे यांच्यासह शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती होती. आ. झांबड यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, महासंघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवावी. महासंघाने गेल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केल्याचा उल्लेख केला. आ.शिरसाट म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनपाला दोष देण्यापेक्षा विधानसभा अध्यक्षांनी सचिव, अर्थमंत्र्यांकडून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आ.सावे म्हणाले, श्रींच्या विसर्जन मिरवणुकीचे मार्ग चांगले होतील. काही रस्त्यांची कामे गटार योजनेमुळे उशिरा होत आहेत.
महासंघाचे काम उल्लेखनीय
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, दरवर्षी हा महासंघ वेगळे काम करतो. शेतकऱ्यांना मदत, विहीर स्वच्छ करताना दगावलेल्या युवकांच्या कुटुंबांना मदतीसारखे व भजन, कीर्तन, जनजागृतीसारखी उल्लेखनीय कामे महासंघाने केली आहेत. १२ वर्षांपूर्वी हा महासंघ सुरू केला. नवीन मिरवणूक मार्ग मिळाला. रस्त्यांवरील खड्डे सर्वांना दिसतात. परंतु अलीकडे कुणाच्याही लक्षात न येण्यासाठी ‘पॉटहोल’ हा शब्द वापरला जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
मंडळाने पुढाकार घ्यावा
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळाने ऐपतीनुसार १ हजार क्युबिक मीटर नदी, नाल्यांचे खोलीकरण करावे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना रुजविण्यासाठी मंडळांनी पुढे यावे. यासाठी २५ हजार रुपये खर्च येईल. यंदा औरंगाबादेत परतीचा पाऊस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.